मडगाव: प्रचंड जनक्षोभामुळे अखेर कोकण रेल्वे काॅपरेशनला आपला रेंट अ बाईक योजना गुंडाळावी लागली. त्याची निविदा रद्द करण्यात आली आहे. या रेन्ट अ बाईक प्रस्तावाला गोव्यातून प्रचंड विरोध झाला होता. स्थानिकांचा रोजगार हिरावून नेण्याचे हे कारस्थान असल्याचाही आरोप झाला होता. अनेक राजकीय पक्षांनीही स्थानिकांना पाठिंबा दर्शाविला होता.गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा फातोर्डयाचे आमदार विजय सरदेसाई यांनी हा प्रादेशीक अस्मितेचा विजय असल्याचे सांगितले. आम्ही सुरुवातीपासून याला विरोध केला होता. यापुढेही आम्ही दक्ष राहू असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही या प्रकरणी लक्ष घातले होते. कोकण रेल्वेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांच्याशी मुख्यमंत्र्याशी झालेल्या भेटीनंतर ही निविदा रद्द करण्यात आली.
काेकण रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी निविदा रद्द करण्यात आल्याचे सांगितले. आपचे आमदार वेन्झी व्हिएगस दक्षिण तसेच उत्तर गोव्यातील रेन्ट अ बाईक असोसिएशनेही विरोध केला होता.
गोव्यातील मडगाव , थिवी, करमळी, काणकोण तसेच कर्नाटकातील कारवार , गोकर्ण रोड व कुमठा रेल्वेस्थानकावर ही सेवा सुरु करण्याचा निर्णय कोकण रेल्वे महामंडळाने घेतला होता. त्यासाठी १८ जूनला निविदा सादर करण्याची अंतिम तारीख होती.
आमदार वेन्झी व्हिएगस यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यात ही निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली होती.