- योगेश मिराशी
पणजी : ‘केस्तांव दे कोफुसांव’या कोंकणी चित्रपटाचा पहिला खेळ (प्रीमियर) आज, रविवारी झाला. हा खेळ पणजीतील कला अकादमीच्या दिनानाथ मंगेशकर सभागृहात झाला. चित्रपट संपल्यानंतर प्रेक्षकांनी याचे तोंडभरून कौतुक केले व अशाच प्रकाराचे कोंकणी चित्रपटांची उतरोत्तर निर्मिती व्हावी, अशी आशा व्यक्त करून या चित्रपटाला यश मिळो, अशा शुभेच्छा दिल्या. या वेळी अनेकांनी चित्रपटातील कलाकारांसोबत सेल्फी व छायाचित्रे काढली.
‘केस्तांव दे कोफुसांव’च्या प्रीमियरला सभागृह तुडुंब भरला होता. या वेळी चित्रपटातील प्रमुख कलाकारांसोबत, तांत्रिक सदस्य व बालकलाकारही उपस्थित होते. त्याचबरोबर गोव्याचे कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक व अन्य कलाकारांनी याला उपस्थिती लावली होती.
या चित्रपटात बहुतेक कलाकार हे गोवेकर आहेत. ‘केस्तांव दे कोफुसांव’हा चित्रपच दोन धर्माच्या कुटुंबाची गोष्ट सांगतो. आबाल-वृद्धांना आवडेल अशी कौटुंबिय मेलोड्रामा या चित्रपटाची पटकथा आहे. चित्रपट रसिकांना खेळवून ठेवतो. तो हसवतो व त्याचबरोबर अंर्तमुखही करतो. जात-धर्माच्या पलिकडे माणूस व मानवतेची पूजा करणे हे किती गरजेचे आहे, हे लोकांना सांगतो. माणसांवर माणूस म्हणूनच प्रेम करा या निकषावर तो संदेश देतो. आपल्या गल्लीत घडणारी ही कथा आहे, असे चित्रपट पाहताना वाटते आणि हे या चित्रपटाचे मोठं यश असल्याचे म्हणावे लागेल.
हा चित्रपट स्वप्नील शेटकर यांनी दिग्दर्शित केला आहे. तर सुचिता नार्वेकर यांची निर्मिती आहे. राज्यात येत्या २८ तारखेला हा चित्रपट म्हार्दोळ, कुडचडे व वाळपई अशा तीन ठिकाणी प्रदर्शित केला जाईल. साखळीत २९ तारखेला आणि मडगावात ३० तारखेला या चित्रपटाचा आस्वाद रसिकांना घेता येईल. युकेमध्ये व दुबईतही या चित्रपटाचे खेळ होणार आहेत.
‘कोंकणी चित्रपटांना गोवा मनोरंजन संस्थेतर्फे चांगली मदत करते. केवळ सरकार अवलंबून राहता येणार नाही. चित्रपटाचे प्रदर्शन होण्याची व्यवस्था तालुका, पंचायत स्तरावर होण्याची गरज आहे. अशा प्रकारच्या साधनसुविधेसाठी सरकराने प्रयत्न करावेत. ठिकठिकाणी छोटी-छोटी चित्रपटगृहेदेखील उभारली पाहिजेत. राज्यातील चित्रपट संस्कृतीच्या संपन्नतेसाठी अशा सुविधांची गरज आहे, असे मत या चित्रपटाच्या निर्मात्या, लेखिका व रंगकर्मी सुचिता नार्वेकर यांनी व्यक्त केले.’
दरम्यान, या चित्रपटात कोंकणी नाटक व चित्रपटाचा सुपरस्टार राजदीप नायक प्रमुख भूमिकेत आहे. तसेच प्रसिद्ध तियात्र कलाकार अनिल पेडणेकर, बंटी उंडेलकर, अनिल रायकर, अवधूत कामत, गौरी कामत, स्पिरीट फर्नांडिस व दोन बालकारांच्या भूमिका आहेत.