बाणावली (गोवा) : भारताच्या नागरी अणुऊर्जा मोहिमेला महत्त्वपूर्ण आयाम देणाऱ्या कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी व रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या उपस्थितीत राष्ट्रार्पण करण्यात आले. रशियाच्या सहकार्याने देशात आणखी आठ अणुभट्ट्या उभारण्याचा प्रस्ताव असल्याचे मोदी यांनी जाहीर करतानाच त्यामुळे अणुऊर्जासंदर्भातील व्यापक सहकार्याचे संकेतही दिले.मोदी व पुतीन यांनी बाणावलीतून तामिळनाडूतील कुडनकुलम प्रकल्पाच्या ई-फलकाचे अनावरण करून राष्ट्रार्पण केले. त्याचप्रमाणे या प्रकल्पाच्या तिसऱ्या व चौथ्या टप्प्याची पायाभरणी केल्याचे जाहीर केले, तर पाचव्या व सहाव्या टप्प्याचे काम दृष्टीक्षेपात असल्याचेही त्यांनी सांगितले.कुडनकुलमच्या पहिल्या टप्प्यामुळे भारताला एक हजार मेगावॅट अणुऊर्जा प्राप्त झाली असून तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात आणखी एक हजार मेगावॅट अणुऊर्जा तयार होणार असल्याचे त्यांनी सांगितले. भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेची गरज, उच्च तंत्रज्ञान व भारतात उत्पादन करण्याच्या या बाबींची पूर्तताही त्यामुळे झाल्याचे त्यांनी सांगितले. भारत-रशिया यांच्यादरम्यान हायड्रोकार्बन क्षेत्रात सहभाग वाढणार असल्याचे जाहीर करतानाच गेल्या चार महिन्यांत भारतीय कंपन्यांनी हायड्रोकार्बन क्षेत्रात साडेपाच अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक रशियाच्या तेल व नैसर्गिक वायू क्षेत्रात केली आहे. या दोन देशांमध्ये नैसर्गिक वायू वाहिनीचा मार्ग सुरू करण्यासाठी लवकरच संयुक्त मोहीम हाती घेण्यात येणार असून नागरी अणुसहकार्य व द्रवरूप नैसर्गिक वायू या दोन्ही क्षेत्रात दोन्ही देशांची एकत्रित भागिदारी होणार असल्याचे मोदी यांनी सांगितले. तेल व नैसर्गिक वायू क्षेत्र व नागरी ऊर्जा क्षेत्र यांच्यातील भागीदारीमुळे दोन देशांतील ऊर्जा क्षेत्रात एक भक्कम सेतू निर्माण होणार असल्याचे ते म्हणाले.
(प्रतिनिधी)