पणजी: राज्यात गेल्या काही दिवसात उष्णता वाढल्याने कामगार आणि रोजगार आयुक्त कार्यालयतर्फे उद्योग आणि आस्थापनांना उष्णतेतून कामगारांना वाचविण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. खुल्या भागात काम करणाऱ्या कामगारांना त्रास होणार नाही याची खात्री करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, तसेच कामगारांच्या कामाच्या वेळेत बदल करण्यात यावे. खासकरून दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंतच्या कामाच्या वेळापत्रकात बदल करावे, अशी सूचना कामगार आयुक्त कार्यालाकडून देण्यात आली आहे.
दिवसभर उन्हात काम करणाऱ्या कामगारांची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी शक्यतो सर्वपरिने उपाययोजना करावी. कामाच्या ठिकाणी कामगारांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. तसेच कोणत्याही कामगार, मजूरांना उष्णतेचा त्रास झाल्यास थेट त्यांना वैद्यकीय सेवा प्रदान करण्यात यावी. कामगार अधिकाऱ्यांनी, कंत्राटदारांनी कामगार, मजुरांसाठी आरोग्य शिबिरे आयोजित करावीत तसेच संवादात्मक सत्रे आयोजित करावीत, जेणेकरून कामगारांची आरोग्याची माहिती मिळणे सोपे होईल. त्याचप्रमाणे कामगारांच्या आरोग्यानुसार कामगारांना काम प्रदान करावे, असेही आयुक्त कार्यालयातर्फे निर्देशात नमूद करण्यात आले आहे.