पणजी : येत्या विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांची उणीव आम्हांला भासेल. पर्रीकर यांनी गोव्यात पक्षाला दिलेली दिशा घेऊनच आम्ही पुढे जाणार आहोत, असे भाजपने गोव्यात निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
फडणवीस म्हणाले की, ‘गेल्या चार निवडणुका मी गोव्यामध्ये सातत्याने येतोय. यावेळी पर्रीकर यांची उणीव निश्चितच भासणार आहे.’ राज्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व भाजप सरकारने जे काम करून दाखवले आहे, ते भाजपला विजयश्री मिळवून देईल. गोव्यात पुन्हा एकदा भाजपचे सरकार स्थापन करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यात विधानसभेचा कार्यकाळ येत्या फेब्रुवारीत संपतो. फडणवीस यांनी याआधीही गोव्याच्या निवडणुकांमध्ये अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. निवडणूक प्रभारी म्हणून त्यांच्या नियुक्तीचे स्थानिक भाजप नेत्यांनी जोरदार स्वागत केले आहे. फडणवीस यांचे आता गोव्यात दौरे सुरू होतील.
मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या नियुक्तीचे स्वागत केले आहे. किशन रेड्डी गंगापूरम आणि दर्शना जार्दोश या भाजपने गोवा निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या सहप्रभारी आहेत. त्यांचेही मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले आहे. या सर्वांच्या मार्गदर्शनाने पक्ष आणखी मजबूत करू आणि येत्या निवडणुकीत २२ पेक्षा अधिक जागा जिंकू, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.