पणजी : पालक आज पाल्यांसाठी दर्जेदार शिक्षण शोधत आहे. चांगले शिक्षण देणाऱ्या शाळांकडे त्यांचा ओढा आहे. यात माध्यमाचा प्रश्न दुय्यम असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी विधानसभेत केले. दर्जेदार शिक्षणाच्या बाबतीत आजवर सरकार कमी पडल्याची प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली.माजी मुख्यमंत्री दिवंगत शशिकला काकोडकर, माजी खासदार संयोगिता राणे-सरदेसाई, स्वातंत्र्यसैनिक शिवाजी कुडचडकर, स्वातंत्र्य सैनिक माधव पंडित, पत्रकार दत्ताराम काणेकर, फुटबॉलपटू पीटर गोम्स, लेखक जॉन मिनेझिस, स्वातंत्र्यसैनिक वसंत पै-रायकर, गायक पंडित श्रीकृष्ण सावळराम हळदणकर, स्वातंत्र्यसैनिक उत्तम खांडेपारकर, स्वातंत्र्यसैनिक विमल रानडे आदी ३१ दिवंगतांना सभागृहात आदरांजली वाहण्यात आली, त्या वेळी ते बोलत होते. इंग्रजी माध्यमाच्या शाळा अनेक आहेत; परंतु तेथे चांगले शिक्षक नसतील तर पालक मराठी, कोकणी प्राथमिक शाळांकडे वळतात. पणजीतील हेडगेवार प्राथमिक स्कूल हे एक उदाहरण आहे, असे पर्रीकर म्हणाले.मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह धरणाऱ्या शशिकलाताई दूरदृष्टीच्या नेत्या होत्या. गोव्याच्या हितासाठी अशा नेत्यांची गरज आहे. त्यांचे पिता गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी पहिल्या अर्थसंकल्पात शिक्षणासाठी एकूण स्थानिक उत्पन्नाच्या १७ टक्के इतकी प्रचंड तरतूद केली होती. तळागाळात शिक्षण पोचावे ही त्यांची दूरदृष्टी होती, असे पर्रीकर म्हणाले. (प्रतिनिधी)
दर्जेदार शिक्षणाचा अभाव
By admin | Published: March 24, 2017 2:34 AM