म्हापसा : बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने आर्थिक व्यवहार केल्या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. झालेला व्यवहार लाखोंच्या घरात असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डिचोली तालुक्यातील एका व्यक्तीच्या नावेबनावट पॅनकार्ड आणि आधार कार्डचा वापर करून म्हापशातील एका खाजगी बँकेत सुमारे ३ महिन्यापूर्वी खाते उघडून आर्थिक व्यवहार करण्यात आला. करण्यात आलेल्या व्यवहाराची रक्कम मर्यादेपेक्षा जास्त असल्याने संबंधीत बँकेकडून तक्रारदाराच्या घरी खात्री करुन घेण्यासाठी पत्र व्यवहार करण्यात आला. बँकेत खाते नसल्याने तक्रारदारानेबँकेकडून पाठवलेल्या पत्रावर दुर्लक्ष केले.
त्यानंतर पुन्हा संशयितांकडून व्यवहार झाल्याने दुसऱ्या वेळीही बँकेकडून पत्र पाठवण्यात आले. दुसऱ्या वेळी आलेल्या पत्राची दखल घेऊन तक्रारदाराने बँकेत चौकशी केली असता त्याच्या नावे बनावट खाते उघडल्याचे त्याच्या लक्षात आले. घडलेल्या प्रकारानंतर त्यांनी म्हापसा पोलीस स्थानकावर तक्रार दाखल केली. केलेल्या तक्रारीच्या आधारावर तपासा अंती म्हापसा पोलिसांनी रझाक बेलवडी ( २६), गौतम कोरगांवकर( ३८), देवानंद कवळेकर( ४३) व राहुल पाडलोस्कर (३८) या संशयितांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास कार्य निरीक्षक सीताकांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आले आहे.