वास्को: शनिवारी (दि.७) संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दुधसागर - सोनावळी या रेल्वे मार्गावर डोंगराळ भागातून मोठ्या प्रमाणात दरड कोसळून रेल्वे रुळावर आल्याने सदर मार्ग रेल्वे वाहतुकीसाठी सध्या ठप्प झाला आहे. दरड कोसळून निर्माण झालेल्या अडथळ््यामुळे दक्षिण-पश्चिम रेल्वे प्राधिकरणाने या मार्गावरून जाणार असलेल्या तीन रेल्वे रद्द केल्या असून वास्को रेल्वे स्थानकावरून दिल्लीला जाणार असलेल्या रेल्वेचा मार्ग मडगाव रेल्वे स्थानकावरून दुस-या मार्गाने (कोकण रेल्वे मार्गाने) वळवण्यात आला आहे.
दक्षिण-पश्चिम रेल्वे प्राधिकरणाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घटना घडली. सध्या पडत असलेल्या मिसळधार पावसामुळे दूधसागर ते सोनावळी या रेल्वे मार्गाच्या बाजूला असलेल्या डोंगराळ भागातून भली मोठी दरड कोसळून ती येथून जाणा-या रेल्वे रुळावर आली. सदर घटना घडलेल्या ठिकाणी रेल्वेला जाण्यासाठी बोगदा सुद्धा असून कोसळलेली दरड रेल्वे बाहेरील रेल्वे रुळाबरोबरच बोगद्याच्या आत असलेल्या रेल्वे रुळावर सुद्धा काही प्रमाणात पसरल्याची माहिती रेल्वे सुत्रांनी दिली.
ही घटना घडल्याने या रेल्वे मार्गावर रेल्वे वाहतूकीसाठी अडथळा निर्माण झाल्यानंतर दक्षिण-पश्चिम रेल्वे प्राधिकरणाने त्वरित पावले उचलून येथे कोसळलेली दरड हटवण्याच्या कामाला सुरवात केल्याचे सूत्रांनी सांगितले. सदर घटनेमुळे ह्या रेल्वे मार्गावर रेल्वे वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झाल्याने तीन रेल्वे रद्द करण्यात आलेल्या असून एक रेल्वेचा मार्ग वळवण्यात आलेला आहे. वास्को रेल्वे स्थानकावरून बेळगाव ला जाण्यासाठी निघालेली रेल्वे (क्र: ०६९२२) कुळेहून रद्द करण्यात आलेली असल्याची माहिती दक्षिण-पश्चिम रेल्वेतील सुत्रांनी दिली.
तसेच हुबळी - लोंडा निझामुद्दीन लिंक एक्सप्रेस रेल्वे (क्र: १७३०५) धारवाडहून रद्द करण्यात आली आहे. वास्को रेल्वेस्थानकावरून बंगळूर जाण्यासाठी निघालेली रेल्वे (क्र: -२७७९) मडगाव रेल्वे स्थानकावर पोचल्यानंतर रद्द करण्यात आल्याची माहीती सूत्रांनी पुढे दिली. याव्यतिरिक्त दुधसागर - सोनावळी येथे दरड कोसळल्याने वास्को रेल्वे स्थानकावरून दुपारी दिल्लीला जाण्यासाठी निघालेली हजरत निजामुद्दीन रेल्वे (क्र: १२७७९) चा मार्ग मडगाव रेल्वे स्थानकावरून दुस-या रेल्वे मार्गाने वळवण्यात आलेला असल्याची माहीती रेल्वे सुत्रांनी दिली.
सदर रेल्वे मडगावहून रोहा, पनवेल, कल्याण अशा रेल्वे मार्गावरून गेल्यानंतर ती पुढे नेहमीच्या मार्गाने मनमाड व इतर रेल्वे स्थानक करून दिल्लीला जाणार असल्याचे कळवण्यात आले आहे. रेल्वे रुळावर कोसळलेली दरड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर चालू असून शनिवारी उशिरा रात्री पर्यंत येथून दरड हटविल्यानंतर हा मार्ग रेल्वे रेल्वे वाहतूकीसाठी सुरळीत करण्याकरीता पुढची पावले उचलण्यात येणार असल्याचे सुत्रांनी माहितीत शेवटी कळविले.