पणजी : मोपा येथे नियोजित विमानतळाच्या ठिकाणी न्यायालयाच्या आदेशाचा भंग करुन जीएमआर कंपनीकडून मोठ्या प्रमाणात वृक्षसंहार चालू असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. राजकीय आश्रयाखाली राज्यात ही दुसरी घुसखोरीच चालली आहे, असे आपचे म्हणणे आहे. पक्षाचे निमंत्रक एल्विस गोम्स यांच्या नेतृत्त्वाखाली २५ सदस्यीय पथकाने गुरुवारी मोपाला धडक दिली. मात्र पोलिसांनी त्यांना तेथे अडविले.
नियोजित विमानतळ बांधकामाच्या ठिकाणी प्रचंड वृक्षसंहार करुन तेथेच ती झाडे पोलिसांदेखत जमिनीत पुरली जातात, असेआढळून आल्याचे आपचे म्हणणे आहे. मोपा येथे जे काही काम चालले आहे त्याबद्दल कोणतीही पारदर्शकता नाही. झाडे कापण्यासाठी शेकडो स्थलांतरित मजुरांना आणले आहे. तब्बल ९५ लाख चौरस मिटर जमीन सरकारने जीएमआर कंपनीच्या घशात घातली आहे, असा आरोप करण्यात आला आहे.
आपचे नेते सिध्दार्थ कारापूरकर जे कोर्टात याचिकादार आहेत त्यांनी असा दावा केला की कंपनी त्यांच्याकडे आवश्यक ते परवाने असल्याचा दावा करीत असली तरी प्रत्यक्षात कोणतेही दस्तऐवज दाखवण्यास अपयशी ठरली आहे. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रदीप पाडगांवकर यांनी हा प्रचंड वृक्षसंहार म्हणजे गोव्यासाठी मृत्युघंटाच असल्याचे म्हटले आहे.
या प्रकल्पाविरुध्द लढा देणारे स्थानिक रहिवाशी संदीप कांबळी यांनी याविरुध्द अखेरचा श्वास असेपर्यंत सामना करु, असे सांगितले. आपचे नेते सुनिल शिंगणापूरकर, विश्वेश प्रभू व इतर याप्रसंगी उपस्थित होते.