पणजी: माध्यान्ह आहारात अळी सापडण्याच्या प्रकरणात कारवाई करण्यासाठी शिक्षण खात्याला १४ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण माध्यान्ह आहारात खरोखरच अळी होत्या हे गोवा अन्न व औषध प्रशासनाच्या अहवालातून स्पष्ट होणे आवश्यक आहे, आणि अहवालासाठी किमान १४ दिवस तरी लागणार आहेत.
सावई वेरे येथील माद्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या माध्यान्ह आहारात अळ्या आढळल्यामुळे एकच गोंधळ उडाला असून पालकही चिंतेत आहेत. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर शिक्षण खात्याकडून तात्काळ कारवाई करताना त्या विद्यालयात दिल्या गेलेल्या माध्यान्ह आहाराच्या नमुन्याची अन्न व औषध प्रशासनाकडून चाचणी करून घेण्याचा आदेश दिला. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षकांनी अन्नाचे नमुने नेले आहेत. नमुन्याची चाचणी सुरू असून अहवाल मिळण्यासाठी किमान १४ दिवस तरी जातील असे अन्न व औषध प्रशासनातील सूत्रांकडून देण्यात आली.
दरम्यान माध्यान्ह आहारात अळ्या सापडण्याच्या वृत्तामुळे राज्यातील सर्वच पालकाना चिंता वाटू लागली आहे. त्या आहारात अळ्या होत्या की नाही हे नंतर स्पष्ट होणारच आहे, परंतु शिक्षण खात्याच्या मार्गदर्शक तत्वानुसार मुलांना आहार देण्यापूर्वी त्याची सबंधित शिक्षकाकडून पाहणे करणे आणि त्याची चव तपासणे सक्तीचे आहे. त्यामुळे शिक्षकाची भुमिकाही या प्रकरणात रडारवर आली आहे.