लोकमत न्यूज नेटवर्क सावईवेरे: सावईवेरे, वळवई व केरी भागातील शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या माध्यान्ह आहारात चक्क अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार काल उघडकीस आला आहे. पुलाव खात असताना त्यामध्ये अळ्या असल्याचे दिसून येताच शाळांनी विद्यार्थ्यांना आहार खाण्यापासून रोखले.
घटनेची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मंगेशी येथील अन्न पुरवठा करणाऱ्या स्वयंसहाय्य गटाच्या स्वयंपाकगृहात भेट देऊन तपासणी केली व पदार्थाने नमुनेही चाचणीसाठी घेतले आहेत. तसेच या संपूर्ण घटनेचा अहवाल शिक्षण खात्याकडे पाठवल्याचे फोंड्याच्या भागशिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.
मंगेशी येथील उत्कर्ष महिला स्वयंसहाय्य गटातर्फे माध्यान्ह आहार पुरवला जातो. काल या परिसरातील शाळांना पुलाव देण्यात आला होता मधल्या सुट्टीत मुले पुलाव खात असताना अचानक अळ्या दिसून आल्याने एकच तारांबळ उडाली शिक्षकांनी तातडीने मुलांना पुलाव खाण्यापासून रोखले. मात्र, तोपर्यंत काही शाळांमधील मुलांनी पुलाव खाल्लाही होता. तर काही सरकारी प्राथमिक शाळांत याबाबत सूचना मिळताच मुलांना आहार दिला नव्हता. सरकारतर्फे मुलांना पुरवण्यात येणारा माध्यान्य आहार हा चांगल्या दर्जाचा व पोषक असावा अन्यथा हा आहार मुलांना देऊच नये. पालक मुलांना घरून आहार देण्यासाठी सक्षम आहेत, असे मत काही पालकांनी व्यक्त केले.
वेळेवर सूचना मिळाली
सावईवेरे येथील संबंधित शाळांच्या मुख्याध्यापिकांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आम्ही जरा उशीरा माध्यान्ह आहार देत असल्यामुळे अळ्या संदर्भात सूचना मिळाली होती. त्यामुळे मुलांना हा आहार आम्ही दिला नसून पर्यायी आहाराची व्यवस्थाही केली. या गटातर्फे चांगल्या दर्जाचा आहार पुरवला जातो. यासंबंधी या गटाच्या कंत्राटदाराने झालेल्या चुकीबद्दल माफीही मागितली आहे.
या प्रकरणी संबंधित विभागाच्या भाग शिक्षणाधिकाऱ्याकडे अहवाल मागितला आहे. तसेच माध्यान्ह आहारात विद्यार्थ्यांना दिल्या गेलेल्या पदार्थांचे नमुने चाचणीसाठी घेण्याची विनंती अन्न व औषध प्रशासनाला केली आहे. अहवाल आल्यानंतर जर का संबंधित आहार पुरवठादार महिला स्वयंसाहाय्य गट दोषी आढळल्यास या गटावर कारवाई केली जाईल. -शैलेश झिंगडे, संचालक, शिक्षण खाते
ज्या दुकानातून सोयाबीन खरेदी करण्यात आले होते, त्या सोयाबीनमध्ये अळ्या आढळल्या. आम्हाला याबाबत काहीच माहिती नाही. यापूर्वी पुलावात सोयाबीनचा कधीच वापर केला जात नव्हता. परंतु शिक्षण खात्याच्या आदेशानुसार पुलावात सोयाबीन असणे बंधनकारक असल्यामुळे प्रथमच सोयाबीन घालण्यात आले होते. - कंत्राटदार.
संबंधित गटातर्फे एरव्ही चांगल्या दर्जाचा आहार पुरविण्यात येतो. परंतु काल दिलेल्या पुलावामध्ये वापरण्यात आलेल्या सोयाबीनमध्ये अळ्या सापडल्या. अजूनपर्यंत एकाही विद्यार्थ्याला कोणतीही बाधा झालेली नाही. - मुख्याध्यापिका, केरी