मडगाव: 6 ते 12 मे हा आठवडा जगभरात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यात यंदाच्या पहिल्या चार महिन्यात रस्ता अपघातातील बळींची संख्या 87 वर पोहोचली असून प्रत्येक महिन्यात गोव्यात रस्त्यावर सरासरी 22 बळी पडत आहेत असे आकडेवारीतून सिद्ध झाले आहे. लहानशा गोव्यात एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर रस्ता अपघातातील बळी ही चिंतेची बाब गणली जात आहे.
जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात गोव्यात रस्ता अपघातांची संख्या जवळपास 1200 एवढी झाली असून यात दुचाकीवाल्यांचे प्रमाण जास्त आहे. ही आकडेवारी अत्यंत महत्वाची असून त्यावरुनच हे अपघात थांबविण्यासाठी कुठली उपाययोजना हाती घेता येणे शक्य आहे. हे ठरविणे शक्य होईल असे गोवा कॅनचे रोलंड मार्टिन्स यांनी सांगितले. रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने गोवाकॅन या संस्थेने जागृती मोहीम हाती घेतली असून या संघटनेचे कार्यकर्ते प्रत्येक पोलीस स्थानकात जाऊन अपघातांची माहिती गोळा करतील असे मार्टिन्स यांनी सांगितले.
मार्टिन्स म्हणाले, सगळेच अपघात वाहन चालकांच्या चुकीमुळे होत असतात असे नव्हे तर कित्येकदा सदोष रस्त्यांमुळेही अपघात होऊ शकतात. त्यामुळेच कुठे अपघात जास्त झालेत त्याची माहिती जमा करुन त्यावर उपाय घेता येणे शक्य होणार आहे. मागच्या चार महिन्यात रस्त्यांवरील बळींचा आढावा घेतल्यास मिळालेली माहिती अशी, जानेवारी महिन्यात 327 अपघातात 27 जणांना मृत्यू आला होता. फेब्रुवारी महिन्यात 298 अपघातात 19 बळी गेले, मार्च महिन्यात 304 अपघातात 24 बळी गेले तर एप्रिल महिन्यात जवळपास 300 अपघात झाले असून त्यात 17 बळी गेल्याची वाहतूक पोलिसांच्या दप्तरात नोंद आहे. मात्र एप्रिल महिन्याची आकडेवारी अजून परिपूर्ण नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.