फोंडा - दक्षिण गोवा लोकसभा मतदार संघात मागच्यावेळी आम्ही अवघ्या मतानी पराभूत झालो. पराभवाचे कारणमिमांसा योग्य वेळी झालेली असून त्या दिवसापासून आम्ही जोरदार काम सुरू केले आहे. गृहमंत्री अमित शहा हे खास दक्षिण गोव्यासाठीच प्रचार सभा घेत असून यावेळी आम्ही विक्रमी मताधिक्याने दक्षिण गोव्याचे जागा प्रधानमंत्री यांना नक्की देऊ अशा शब्दात मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी आपला विश्वास व्यक्त केला. दिनांक 16 रोजी गोवा अभियांत्रिकी मैदानावर गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर प्रचार सभा होणार आहे. त्यानिमित्त तिथे चाललेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी त्यांच्याबरोबर प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे, माजी आमदार दामू नाईक, भाजपचे खजिनदार संजीव देसाई ,फोंडा भाजप मंडळ अध्यक्ष विश्वनाथ दळवी, एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की 'मागच्या वेळी सुमारे शंभर जागा ह्या अवघ्या मतानी भाजपच्या हातातून निसटल्या होत्या. त्या शंभर जागा व आणखीन 50 अशा 150 जागावर भाजपच्या केंद्रीय समितीने खास लक्ष दिले असून, दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ सुद्धा अवघ्या मताने आमच्या हातातून निसटला होता. यावेळेस तो मतदार संघ पूर्णपणे बांधून घेण्यात आलेला आहे. कार्यकर्त्यांमध्ये पूर्वीपासूनच उत्साह आहे. सदरचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठीच दक्षिण गोव्यात जाहीर सभा होत आहे. दक्षिण गोव्यातूनच किमान 25000 कार्यकर्ते या सभेला उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय मंत्री श्रीपाद नायक, गोव्यातील सर्व मंत्री, आमदार व भाजपचे नेते ह्या सभेला उपस्थित राहणार आहेत .ठीक चार वाजता सभेस सुरुवात होईल .तर पाच वाजता गृहमंत्री अमित शहा यांचे सभास्थानी आगमन होणार आहे. ह्या प्रचार सभेच्या निमित्ताने सर्व मंत्री आमदार व भाजपच्या पदाधिकाऱ्यांबरोबर अमित शहा याची बैठक सुद्धा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
आगामी नगरपालिका निवडणुका संदर्भात बोलताना ते म्हणाले की साखळी व फोंडा दोन्ही नगरपालिका मध्ये भाजपचे स्वतंत्र पॅनल उभे राहणार असून, आम्ही दोन्ही नगरपालिकासाठी चांगले व सक्षम उमेदवार देणार आहोत. दोन्ही नगरपालिकेतील सर्वच्या सर्व नगरसेवक हे भाजपचे असतील याबद्दल शंका नाही. दोन्ही नगरपालिकेवर भाजपचाच झेंडा असेल.
सभेच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना यावेळी मुख्यमंत्री व गोविंद गावडे यांनी महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत. वाहतुकीमध्ये बदल सुद्धा सुचवण्यात आले आहेत. लोकांनी मोठ्या संख्येने सदर सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.