पणजी : येथील मांडवी नदीत सहावा तरंगता कॅसिनो येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकार निवडणूक आचारसंहितेचे कारण देण्याव्यतिरिक्त अन्य कोणतेच सबळ कारण देऊन कॅसिनोविरुद्ध ठाम भूमिका घेऊ शकले नाही. परिणामी, मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने बुधवारी गोल्डन ग्लोब हॉटेल्स कंपनीने तरंगत्या कॅसिनोच्या परवान्याच्या नूतनीकरणासाठी केलेल्या अर्जावर येत्या २४ तासांत निर्णय घ्या, असा आदेश गोवा सरकारला दिला. यामुळे अर्थातच अर्जदार कंपनीला कायद्याच्या बऱ्याच लढाईनंतर दिलासा मिळाला. मांडवी नदीत सहावा तरंगता कॅसिनो सुरू करण्यासाठी गोल्डन ग्लोब कंपनीने शारजाहून जहाज गोव्यात आणले आहे. हे जहाज चिखली येथे असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. हरियाणाचे माजी गृहमंत्री गोपाळ कांडा यांची ही गोल्डन ग्लोब कंपनी आहे.गृह खात्याने बुधवारी न्यायालयास प्रतिज्ञापत्र सादर केले व गोल्डन ग्लोब कंपनीच्या अर्जावर निर्णय घेण्यामध्ये निवडणूक आचारसंहितेचा अडथळा येत असल्याचा मुद्दा स्पष्टपणे मांडला. आणखी आठ आठवड्यांची मुदत दिली जावी व नव्या सरकारच्याच काळात निर्णय व्हावा, अशीही विनंती गृह खात्याने केली. या वेळी अॅडव्होकेट जनरलांनी मात्र न्यायालयास सांगितले, की आचारसंहितेचा एक मुद्दा जर वगळला तर गोल्डन ग्लोब ही कंपनी कॅसिनो परवान्याचे नूतनीकरण मिळविण्यास पात्र ठरते.कंपनी नवा परवाना मागत नाही. परवान्याचे नूतनीकरण मागत असल्याने आचारसंहितेचा अडथळा येतच नाही, असा मुद्दा याचिकादार कंपनीच्या वकिलाने मांडला. (खास प्रतिनिधी)
मांडवीत अखेर सहावा कॅसिनो
By admin | Published: March 09, 2017 2:11 AM