पणजी : भाजपाच्या कोअर टीमच्या पाच सदस्यांनी गुरुवारी सायंकाळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची करंजाळे येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी अनौपचारिक चर्चा झाली. मात्र माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व माजी मंत्री दयानंद मांद्रेकर हे या बैठकीवेळी उपस्थित राहिले नाहीत.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक व खासदार नरेंद्र सावईकर हे दिल्लीत आहेत. त्यामुळे ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीवेळी येऊ शकले नाहीत. पार्सेकर व मांद्रेकर या दोघांनीही बोलविण्यात आले होते पण ते आले नाहीत. पार्सेकर यांनी तर बैठकीवर बहिष्कारच टाकल्याचे मानले जात आहे. सध्या पार्टीच्या कोअर कमिटीला काही अर्थ राहिलेला नाही. कोअर कमिटीमध्ये चर्चा करून जर निर्णय घेतले जात नसतील तर मग त्या कमिटीला व कमिटीच्या बैठकीला काही अर्थच राहत नाही, असे पार्सेकर यांनी सांगितले. अशा बैठकीला गेलो काय किंवा न गेलो काय तरी सारखेच, असे पार्सेकर म्हणाले. फ्रान्सिस डिसोझा हेही कोअर कमिटीचे सदस्य आहेत पण ते आजारी आहेत व त्यांनी कोअर कमिटीला रामराम ठोकल्यात जमा आहे, असे सुत्रांनी सांगितले.
राजेंद्र आर्लेकर, दत्ता खोलकर, सदानंद शेट तानावडे व संजीव देसाई हे कोअर कमिटी सदस्य मात्र पर्रीकरांना भेटले. पंधरा मिनिटे त्यांनी पर्रीकरांशी चर्चा केली. आम्ही फक्त पर्रीकर यांच्या आरोग्याविषयीच बोललो. अन्य कोणतीच राजकीय चर्चा झाली नाही. पर्रीकर यांची प्रकृती आता बरी दिसली, असे तानावडे यांनी लोकमतला सांगितले.
भाजपा खासदार दिल्लीत गोव्यातील खनिज खाणी सुरू केल्या जाव्यात अशी मागणी घेऊन भाजपाचे तीन खासदार तसेच वीज मंत्री निलेश काब्राल आणि आमदार प्रमोद सावंत हे गुरुवारी सायंकाळी दिल्लीत दाखल झाले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना भेटून आम्ही खाणी लवकर सुरू करा अशी मागणी मांडण्यासाठी भेटत आहोत, त्यामागे कोणताच राजकीय चर्चेचे कारण नाही, असे प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर म्हणाले. भाजपाच्या चार मंत्र्यांनी पंतप्रधानांना भेटावे, असे अगोदर ठरले होते पण त्याविषयी पुढे काही झाले नाही.