ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 11 - मांद्रेत लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याविरुद्धचा कौल भाजपासाठी मोठा धक्का ठरला आहे. नोक-या तसेच अन्य प्रश्नांवर पार्सेकर यांच्यावर लोकांची प्रचंड नाराजी दिसून आली होती. मुख्यमंत्री बनल्यानंतर मांद्रेतील लोकांना त्यांच्याकडून नोक-यांची मोठी अपेक्षा होती. ती त्यांनी पूर्ण केली नाही.
मुख्यमंत्री बनल्यानंतरच्या काळात तर मतदारसंघासाठी वेळच दिला नाही. नोक-या नाहीत आणि विकासकामेही नाहीत, अशा तक्रारी त्यांच्या मतदारसंघातून येत होत्या. काँग्रेसचे उमेदवार दयानंद सोपटे यांच्यासाठी या वेळी जमेची बाजू म्हणजे काँग्रेसमध्ये नेहमी होणारी बंडखोरी या वेळी झाली नाही.
मांद्रेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलपांच्या कॉलेजची मान्यता रद्द करण्याचा पार्सेकर यांनी केलेला प्रयत्न या निवडणुकीत काँग्रेसने प्रचारात महत्त्वाचा मुद्दा बनवला होता. शिक्षणाचा भाजपा सरकारने मांडलेला खेळखंडोबा आणि राजकारण मांद्रेतील मतदारांना अजिबात रुचलेले नाही, हे या मतदारसंघातील निकालातून दिसून आले.
लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा साडेतीन हजार मतांनी पराभव झाला आहे. निकाल हाती येण्याआधी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मंदिरात जाऊन देवदर्शन घेतलं होत. देवाची इच्छा असेल तर पुन्हा नक्कीच मुख्यमंत्री होईन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. पण त्यांना पराभवानाचा धक्का सहन करावा लागला आहे.