पणजी : माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांच्याविरुद्ध टीकेची झोड उठवली तरी, पार्सेकर यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिलेली नाही. तथापि, विरोधी काँग्रेस पक्षाने अलिकडेच पार्सेकर यांना काँग्रेसचे तिकीट स्वीकारावे अशी विनंती केली आहे. पार्सेकर यांनी मात्र त्याविषयी कोणताच निर्णय घेतलेला नाही.
मांद्रे मतदारसंघाच्या आमदारकीचा व काँग्रेसच्या सदस्यत्वाचा दयानंद सोपटे यांनी राजीनामा देऊन भाजपाची वाट धरल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर हे नुकतेच पार्सेकर यांना भेटले. चोडणकर यांनी पार्सेकरांशी बराचवेळ राजकीय चर्चा केली. विधानसभेच्या पोटनिवडणुकीवेळी पार्सेकर यांनी काँग्रेसला पाठींबा द्यावा अशी विनंती चोडणकर यांनी पार्सेकर यांना केली. पार्सेकर यांनी काँग्रेसचे तिकीट स्वीकारावे अशीही विनंती चोडणकर यांनी केल्याची माहिती सुत्रंकडून मिळाली. मात्र पार्सेकर यांनी आपण भाजपामध्ये असून आपण विविध पर्यायांचा सध्या अभ्यास करत आहोत व आपल्या कार्यकर्त्यांशी बोलत आहोत, असे चोडणकर यांना सांगितल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले. सोपटे यांचा पराभव करणे हे काँग्रेसचे व पार्सेकर यांचे सध्या ध्येय आहे.
चोडणकर यांनी ही बैठक गुप्तच ठेवली होती पण पार्सेकर यांच्या एका कार्यकत्र्यावा बैठकीची माहिती मिळाल्यानंतर तिथून माहिती बाहेर आली असा संशय चोडणकर यांच्या समर्थकांना आहे.
दरम्यान, पार्सेकर यांनी अपक्ष निवडणुकीला उभे करावे अशी मागणी पार्सेकर यांच्या काही कार्यकर्त्यांनी केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी संघचालक सुभाष वेलिंगकर यांनीही मांद्रेतील राजकीय हालचालींवर लक्ष ठेवले आहे. सोपटे यांना भाजपामध्ये प्रवेश दिल्यानंतर पार्सेकर यांनी पक्षाच्या स्थानिक नेतृत्वावर टीकेची झोड उठवली व त्यामुळे भाजपाच्या गाभा समितीच्या बैठकांना अलिकडे पार्सेकर यांना बोलविलेच जात नाही.