पणजी : माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तसेच माझ्यासह मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरही यांना शिवीगाळ केली, अपशब्द वापरले याबाबत पार्सेकर यांनी भाजपाची माफी मागावी, अशी मागणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी मंगळवारी येथे केली आहे. यामुळे पार्सेकर यांच्या बंडाला आता वेगळेच वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तेंडुलकर हे राज्यसभा खासदारही आहेत. पार्सेकर हे दोनवेळा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व 2017 च्या निवडणुकीपर्यंत अडीच-तीन वर्षासाठी मुख्यमंत्रीपदी होते. काँग्रेसचे माजी दयानंद सोपटे यांना भाजपामध्ये प्रवेश दिल्याचे वृत्त आपण पार्सेकर यांना सांगितल्यानंतर पार्सेकर यांनी मला शिवीगाळ केली. तसेच आपण जे काही बोलतोय त्याचे मोबाईलवर रेकॉर्डिंग कर आणि ते रेकॉर्डिंग शहा यांना ऐकव असेही पार्सेकर यांनी मला सांगितले व अत्यंत वाईट शिव्या हासडल्या. शहा यांना त्यांनी मोबाईलवर शिवीगाळ केली. पार्सेकर हे उच्चशिक्षित असून त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती.
लोकमतशी बोलताना तेंडुलकर म्हणाले की, पार्सेकर यांना आम्ही नेहमीच सर म्हणत आलो होतो. त्यांना कधीच नावाने हाक मारत नव्हतो. ते व्यवसायानेही शिक्षक व आमच्यासाठीही सर होते. आपण कमी शिकलेलो आहे. मी एखाद्यावेळी शिवी हासडली तर ते कुणीही समजून घेईल पण पार्सेकरांनी तरी गलिच्छ शिव्यांचा वापर करायला नको होता. पार्सेकर यांनी आता पक्षात मान गमावलेला आहे. आता त्यांना पक्षात कुणी सर म्हणणार नाही. त्यांनी पर्रीकर यांनाही अत्यंत वाईट शब्द वापरले आहेत.
तेंडुलकर म्हणाले, की पार्सेकर यांची आताची वागणूक व त्यांनी केलेली शिवीगाळ याविषयीची सगळी माहिती आम्ही पक्षाच्या केंद्रीय नेत्यांना कळवलेली आहे. केंद्रीय नेते योग्य तो निर्णय घेतील. काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेले दयानंद सोपटे यांना मंत्रिपद देण्याची हमी कुणीच दिलेली नाही. आम्ही सोपटे यांना पक्षाच्या पणजीतील कार्यालयात मंगळवारी बोलावले होते. आपण मांद्रेत घेतलेल्या सभेला झालेली प्रचंड गर्दी पाहून उत्साहाने बोललो, मला मंत्रीपद मिळेल असे मला वाटते असे मी बोललो होतो असे सोपटे यांनी आम्हाला सांगितले. सोपटे यांनी यापुढे गर्दीसमोर काळजीपूर्वकच बोलावे असा सल्ला आम्ही दिला.