- सुशांत कुंकळयेकरमडगाव: शेवटपर्यंत आपले राजकीय पत्ते उघड न करता ऐनवेळी शो करणारे धूर्त राजकारणी अशी प्रतिमा असलेले पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी पुन्हा एकदा आपले हे कसब दाखवून दिले. अगदी दोन दिवसांपूर्वी सुदिन ढवळीकर हेच आमचे नेते असे अगदी छातीवर हात मारून सांगणा-या बाबूंनी बुधवारी पहाटे दीपक पाऊसकर यांच्यासह भाजपात प्रवेश करून बाबू म्हणजे नेमके कसले पाणी याची झलक मगो नेतृत्वाला दाखवून दिली.बुधवारी पहाटे सगळे जण साखर झोपेत असताना बाबू आजगावकर व त्यांचे मगोतील सहकारी दीपक पाऊसकर यांनी मगो पक्षात फूट पाडत भाजपात पहाटे पावणे दोनच्या सुमारास प्रवेश घेतला. तब्बल 12 वर्षांनी बाबू पुन्हा एकदा भाजपात सामील झाले आहेत. 2000 साली काँग्रेसचे आमदार असताना बाबू आजगावकर असेच त्यावेळचे मुख्यमंत्री फालेरो यांना वाकुल्या दाखवत भाजपात प्रवेशकर्ते झाले होते. 2007 साली आजगावकर यांनी भाजपाला रामराम करीत पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा त्याग करीत त्यांनी मगोच्या उमेदवारीवर पेडणेतून आमदारकी मिळवली होती.तळागाळातून वर आलेल्या बाबू आजगावकर यांचा हा सर्व राजकीय प्रवास विसंगतीचा दिसला असला तरी जेथे सत्ता तेथे बाबू या न्यायाप्रमाणे प्रत्येक वेळी त्यांनी आपले पक्ष बदलले असून एकेकाळी मडगावातील झोपडपट्टीचा नेता अशी ओळख असलेल्या बाबू आजगावकर यांनी मंत्रिपदापर्यंत मारलेली मजल थक्क करणारी आहे. कधी बाबु नायक कधी एदुआर्द फालेरो, कधी लुईझिन फालेरो तर कधी मनोहर पर्रीकर यांचा आधार घेत बाबू आजगावकर यांनी हा प्रवास केला आहे. बाबूंचा हा राजकीय प्रवास त्यामुळेच सामान्य लोकांना थक्क करणारा वाटतो.मडगावात काही जुन्या राजकारण्यांशी संपर्क साधला असता, बाबू नायक हे गोव्याचे मंत्री असताना त्यांचाच हात धरून बाबू आजगावकर राजकारणात शिरले, अशी माहिती प्राप्त झाली. त्यानंतर त्यांनी बाबू नायकांची साथ सोडून एदुआर्द फालेरो यांची शागिर्दी केली. एदुआर्दला जवळ असतानाच आजगावकर एदुआर्दचे विरोधक असलेल्या लुईझिन फालेरो यांच्या गोटात शिरले. लुईझिन फालेरो यांच्यामुळे 2000 साली बाबू आजगावकर हे पहिल्यांदाच धारगळ मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले. मात्र त्याच लुईझिन फालेरोंच्या पाठीत खंजीर खुपसत ते नंतर भाजपातही सामील झाले.आता भाजपात नव्याने केलेल्या आपल्या प्रवेशाचे समर्थन करताना आजगावकर यांनी, आम्हाला कुठल्याही परिस्थितीत सरकार पाडायचे नव्हते. मात्र मगो नेतृत्व सरकार पाडण्याचा विचार करत होते असे सांगितले आहे. आपण जरी मगोचा आमदार असले तरी मगोच्या नेतृत्वाने आपल्याला किंवा आपले सहकारी दीपक पाऊसकर यांना कधीही विश्वासात घेतले नाही. शिरोडय़ातील पोट निवडणुकीत मगोचा उमेदवार उभा करण्याचा निर्णयही आम्हाला न विचारताच घेतला गेला. आता लवू मामलेदार यांच्यावर कारवाई करतानाही आम्हाला विचारले नाही. मगो अध्यक्ष दीपक ढवळीकर यांच्या या अशा निर्णयामुळेच आम्हाला मगो पक्ष सोडावा लागला असे समर्थन त्यांनी केले आहे.
झोपडपट्टी नेता ते मंत्रिपदापर्यंतचा बाबू आजगावकर यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 6:39 PM