- सद्गुरू पाटील मनोहर पर्रीकर यांचा १३ डिसेंबर १९५५ रोजी म्हापसा येथे जन्म झाला. विद्यार्थी दशेतच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले. संघाचे ते स्वयंसेवक बनले. प्रथम तिसवाडीत व नंतर उत्तर गोव्यात त्यांनी संघाचे काम केले. गावागावांत ते फिरायचे. मुंबईत आयआयटीमध्ये मॅटलर्जिकल इंजिनीअरिंग ही पदवी प्राप्त करून आल्यानंतरही त्यांनी गोव्यात संघाचे काम केले. नंतर ते भाजपचे काम करू लागले. पर्रीकर यांनी राजकीय कारकिर्दीत गोव्यात कधीच मंत्रिपद स्वीकारले नाही. ते थेट मुख्यमंत्रीच झाले. १९९४ साली आमदार, मग विरोधी पक्षनेते आणि मग मुख्यमंत्री व २०१४ साली केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर देशाचे संरक्षणमंत्री असा राजकीय प्रवास पर्रीकर यांनी केला. संरक्षणमंत्रिपद भूषवूनही पुन्हा २०१७ साली गोव्यातील विचित्र राजकीय परिस्थितीमुळे पर्रीकर यांना मुख्यमंत्रिपद स्वीकारावे लागले. १४ मार्च २०१७ रोजी पर्रीकर यांनी चौथ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. २००० ते २०१८ पर्यंतच्या कालावधीत चारवेळा मुख्यमंत्री बनलेला हा नेता आहे. दोन-तीनवेळा त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिले.पर्रीकर यांनी मुख्यमंत्रिपदी असताना अर्थ व गृह ही दोन मोठी खाती कायम आपल्याकडे ठेवली. भाजपच्या सहभागाने गोव्यात २९ जुलै १९९८ रोजी स्व. डॉ. विली डिसोझा यांच्या नेतृत्वाखाली गोवा राजीव काँग्रेस पक्षाचे सरकार अधिकारावर आले. भाजप व मगोप हे दोन्ही पक्ष त्या सरकारमध्ये होते. भाजपच्या आयुष्यात प्रथमच जुलै १९९८ मध्ये भाजपचा सत्तेत सहभाग घडला. मात्र, पर्रीकर त्या वेळी मंत्रिपदापासून दूर राहिले.भाजपच्या आमदारांनी तेव्हा मंत्रिपदे स्वीकारली नाहीत. मगोपने स्वीकारली. भाजपने बाहेरून पाठिंबा दिला. ते सरकार फक्त ११७ दिवस टिकले. २४ नोव्हेंबर १९९९ रोजी फ्रान्सिस सार्दिन यांच्या नेतृत्वाखाली गोवा पीपल्स काँग्रेस पार्टीचे सरकार अधिकारावर आले. त्या सरकारमध्ये भाजपच्या आमदारांनी मंत्रिपदे स्वीकारली. मात्र, पर्रीकर यांनी मंत्रिपद स्वीकारले नाही. भाजपचे तीन आमदार त्या सरकारमध्ये मंत्री झाले. पर्रीकर मुद्दाम मंत्रिपदापासून दूर राहिले. सार्दिन सरकार जास्त काळ टिकणार नाही याची त्यांना कल्पना होती. ते सरकार ३३४ दिवस टिकले व मग पर्रीकर आॅक्टोबर २००० मध्ये थेट सीएम बनले.२ फेब्रुवारी २००५ ते दि. ८ मार्च २०१२ अशी सात वर्षे पर्रीकर यांना विरोधी बाकांवर बसावे लागले. त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून प्रभावी कामगिरी करून दाखवली. गोव्याच्या प्रत्येक गावात आणि शहरात फिरून त्यांनी लढवय्ये विरोधी पक्षनेते अशी आपली जबरदस्त प्रतिमा तयार केली. यामुळेच २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे २१ उमेदवार निवडून आले. पर्रीकर यांनी २०१२ च्या निवडणुकीवेळी प्रभावी सोशल इंजिनिअरिंग केले आणि भाजपतर्फे प्रथमच सहा ख्रिस्ती उमेदवार निवडून आले. नोव्हेंबर २०१४ मध्ये पर्रीकर यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून जावे लागले. मार्च २०१७ मध्ये पुन्हा ते गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून आले.पणजीत १९९४ सालापासून एकदाही आमदारकीची निवडणूक पर्रीकर हरले नाहीत, हा मोठा विक्रम आहे. म्हापशात जन्मलेले पर्रीकर राजधानी पणजीतूून निवडणूक लढवतात वप्रत्येक विधानसभा निवडणुकीत व पणजीतील पोटनिवडणुकीतही जिंकून येतात, असा करिष्मा पणजीत तरी यापूर्वी कुणालाच करता आला नाही. पंचवीस वर्षांपैकी तेवीस-चोवीस वर्षे पर्रीकर यांनी पणजीची आमदारकी भूषवली.
गोव्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारा नेता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 6:59 AM