पणजी : गोव्यातील काँग्रेसमधील सोनिया गांधी निष्ठांचे म्हणजेच ओल्ड गार्डचे दिवस आता मागे पडले आहेत असे स्पष्ट संकेत गिरीश चोडणकर यांच्या नियुक्तीमुळे प्राप्त होत आहेत. काँग्रेसच्या काही ज्येष्ठ आमदारांचा जरी चोडणकर यांना आक्षेप होता, तरी देखील चोडणकर यांची नियुक्ती काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी करून काँग्रेसमधील ज्येष्ठांना योग्य तो संदेश दिला आहे.
प्रतापसिंग राणे, शांताराम नाईक, रवी नाईक, सुभाष चोडणकर, फ्रान्सिस सार्दिन, लुईडिन फालेरो, दिगंबर कामत आदी काँग्रेसमधील काही ज्येष्ठ नेते हे जुन्या पठडीतील मानले जातात. राणे हे गिरीश चोडणकर यांच्यासाठी अनुकूल नव्हते. कामत हेही अनुकूल नव्हते आणि रवी नाईक हे डबल गेम खेळत होते. आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनाही स्वत:ला अध्यक्ष बनण्याची इच्छा होती. या सगळ्य़ा पाश्र्वभूमीवर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी चोडणकर यांचीच नियुक्ती केल्यास गोव्यातील लोकांमध्ये योग्य तो संदेश जाईल हे राहुल गांधी यांना पटवून देण्यात काँग्रेसचे गोवा प्रभारी चेल्लाकुमार हे यशस्वी ठरले. जर काँग्रेसमधील एखाद्या जुन्या नेत्याकडेच प्रदेशाध्यक्षपद सोपविले गेले असते तर काँग्रेस पक्ष नव्या रक्ताला वावच देत नाही, असा संदेश काँग्रेसच्या युवा कार्यकत्र्यामध्ये गेला असता.
काँग्रेसच्या गोव्यातील नेत्यांमध्ये सोनिया गांधी यांच्याशी निष्ठा असणारे अनेकजण आहेत. मात्र काँग्रेसमध्ये आता नवा अध्याय सुरू झाला आहे. राहुल गांधी यांच्याकडे पक्षाची सुत्रे आल्याने गोव्यातही काँग्रेसचे नेतृत्व तरुण नेत्याकडे सोपविणो गरजेचेच होते. ती गरज राहुल गांधी यांनी पूर्ण केली आहे. काँग्रेसमधील काही नेत्यांनी भाजपमधील नेत्यांशी कायम चांगले संबंध ठेवले. रस्त्यावर उतरून सरकारविरुद्ध संघर्ष करणो अशा नेत्यांनी टाळले. मात्र ते दिवस आता मागे पडतील.
आमदारांना भेटणार चोडणकरदरम्यान, चोडणकर यांनी लोकमतला सांगितले, की आपण प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारण्यापूर्वी काँग्रेसच्या सर्व आमदारांना अगोदर भेटेन. त्यांना भेटल्याशिवाय आपण पद स्वीकारणार नाही. गोव्यातील सरकार पाडणो हे आमचे प्राधान्य नाही. मात्र लोकांनी कौल काँग्रेसला दिला होता. सरकार पाडण्याएवढे संख्याबळ काँग्रेसकडे नाही. सध्याच्या आघाडी सरकारमधील घटकच हे सरकार पाडतील तेव्हा काँग्रेस पक्ष काय ती भूमिका पार पाडेल. काँग्रेसमध्ये युवकांना आपण वाव देईन. शिवाय जे काँग्रेस पक्षापासून दूर राहिले त्यांनाही जवळ आणीन. लोकांचे जे शत्रू ते काँग्रेसचे म्हणजेच आमचे शत्रू असतील. गोमंतकीयांना जे हवे आहे, तेच आम्हाला हवे आहे. गोव्याच्या हिताविरुद्ध जे कुणी असतील, त्यांच्याविरोधात आम्ही संघर्ष करू. लोकांच्या अपेक्षांची पुर्ती करणो हे काँग्रेसचे ध्येय असेल. लोकांच्या अपेक्षांपासून पक्ष दूर जाणार नाही.