लोकमत न्यूज नेटवर्क मडगावः प्रत्येक चित्रपट आपल्याला नवीन काही तरी शिकवून जातो. चित्रपटांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी शिकून घ्यायला मिळेल. ती सर्जनशीलता सर्वांनी शिकून घ्यायला हवी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
मडगाव रवींद्र भवनात आयोजित करण्यात आलेल्या बुलबुल आंतरराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सवाच्या उद्द्घाटनप्रसंगी ते बोलत होते. चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नाही. जरी चित्रपटातून करिअर घडवता येते. केवळ चित्रपट हेच तेवढे करिअरचे माध्यम नाही. त्याच्या जोडीला चित्रपटातून विविध गोष्टी शिकून नवीन करिअर घडवता येते. ते शिकून घेण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
अंतरंग आणि राज्य सरकारच्या माहिती व प्रसिद्धी खात्याने ज्या उद्देशाने हा बालचित्रपट महोत्सव आयोजित केला आहे तो अधिक सफल होण्याची गरज आहे. त्यांनी त्यादृष्टीने विविध शाळांना निमंत्रणे दिलेली असून मोठ्या प्रमाणात पास दिलेले आहेत. त्याचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी या महोत्सवात सहभागी व्हावे आणि या महोत्सवाचा आनंद घ्यावा. पालकांनाही या चित्रपट महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
आमदार दिगंबर कमत यांच्या वक्तव्याचा संदर्भ देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, पालकत्व हे एक कौशल्य असून ते शिकण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे पालकत्व कौशल्यासंदर्भात मार्गदर्शन करणारे काही चित्रपटही या महोत्सवात असून ते पालकांनी आवर्जून पाहावे. कारण असे चित्रपट पाहिले, तर पालकत्व कसे करावे हे खूप चांगल्या पद्धतीने शिकता येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी आमदार तथा या महोत्सवाचे अध्यक्ष दिगंबर कामत महोत्सवाचे उपाध्यक्ष दामू नाईक, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, रवींद्र भवनचे अध्यक्ष राजेंद्र तालक, उपाध्यक्ष मनोहर बोरकर, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर व इतर मान्यवर उपस्थित होते. या महोत्सवासाठी मुख्यमंत्र्यांचे सहकार्य लाभले. म्हणून हा महोत्सव घडवून आणण्यात यश मिळाले. बुलबुल आंतरराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सव आयोजित करण्याचा मान प्रथम गोवेकरांना मिळाला आहे, असे आमदार कामत यांनी सांगितले. 'नाळ २' या चित्रपटाने या महोत्सवाची सुरुवात झाली,
निर्मात्यांसाठी सुधारित अर्थसाहाय्य योजना
गोमंतकीय सिने निर्मात्यांसाठी लवकरच सरकार सुधारित अर्थसाहाय्य योजना जाहीर करणार असल्याचे मुख्यमंत्री सांवत यांनी सांगितले. लवकरच कोकणी चित्रपट महोत्सवाचेही आयोजन केले जाईल तसेच यापुढे दरवर्षी बाल चित्रपट महोत्सव होईल, असे त्यांनी जाहीर केले.