पणजी : लहान राज्यांच्या विधानसभांचे अधिवेशन वर्षाला किमान ४० दिवस आणि मोठ्या राज्यांचे ७० दिवस, तर संसदेचे १०० दिवस अधिवेशन असावे, अशी सूचना केंद्रीय संसदीय व्यवहारमंत्री व्यंकय्या नायडू यांनी येथे झालेल्या ‘व्हिप’ परिषदेत केली. अधिवेशनाचे दिवस कमी होणे, कामकाज तहकूब करण्याची वेळ येणे, संसदेचे कामकाज कमी होणे या बाबी लोकशाहीसाठी चिंतेच्या असल्याचे नायडू यांनी सांगितले. राजकारण्यांच्या गुन्हेगारीमुळे संसदेची विश्वासार्हर्ता कमी झाल्याचे मतही नायडू यांनी व्यक्त केले. लोकप्रतिनिधींमध्ये वाढत असलेली गुन्हेगारी, पैशांचा वापर व त्यांची वागणूक यामुळे संसदेची पत खालावत आहे. त्याला संसदेबरोबरच राज्य विधिमंडळही अपवाद नाही, असे नायडू यांनी सांगितले. लोकप्रतिनिधींच्या कामगिरीबद्दलही लोक समाधानी नाहीत, असे दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. लोकप्रतिनिधींची प्रतिमा जनमानसामध्ये चांगली नाही, ही चिंतेची बाब आहे. हे चित्र बदलण्याची गरज आहे आणि त्यासाठी लोकप्रतिनिधींनी गांभीर्यपूर्वक काम करण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची सूत्रे हाती घेतल्यापासून काही चांगल्या गोष्टींना सुरुवात झाली आहे. त्यामुळे देशवासियांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
लहान राज्यांना किमान ४० दिवसांचे अधिवेशन
By admin | Published: October 14, 2014 1:41 AM