फोंडा : करंजाळ-मडकई येथील खाजन शेतीत मासेमारी करण्यासाठी पाणी अडवून ठेवले जात आहे. त्यामुळे या भागातील घरे, तसेच प्राथमिक विद्यालय आणि देवस्थान सभागृहाला धोका निर्माण झाला आहे. यासंबंधी संबंधित अधिकारी वर्गाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही कोणतीही कारवाई तसेच उपाययोजना केली जात नसल्यामुळे मंगळवारी करंजाळ येथील दहाजण समाजाच्या लोकांनी फोंडा मामलेदार कार्यालयात येऊन निवेदन दिले. याबाबत संकल्प फडते यांनी सांगितले की, करंजाळ येथे पारंपरिक खाजन शेतीत गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदा मासेमारी सुरू आहे. त्यासाठी नदीचे पाणी शेतात घेऊन अडवून ठेवले जाते. त्यामुळे या भागातील घरांना धोका निर्माण झाला आहे. काही भागातील कडा कोसळू लागल्या आहेत. या शेतीलगतच प्राथमिक शाळा असून देवस्थान सभागृहही आहे. पाणी अडवून ठेवण्याचा प्रकार सुरूच राहिल्यास या शाळा आणि सभागृहाला धोका निर्माण होणार आहे. मामलेदार कार्यालयाने शेतीची त्वरित पाहणी करून अडवून ठेवलेले पाणी सोडून संभाव्य धोका टाळण्याची करंजाळ दहाजण समाजाची मागणी आहे. मामलेदार राशोल फर्नांडिस यांनी बुधवारी पाहणी करण्याचे आश्वासन दिल्याचे संकल्प फडते यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मत्स्यपालनासाठी खाजन शेतीत अडवलेले पाणी सोडा
By admin | Published: February 25, 2015 2:58 AM