पणजी - गोवा विधानसभेत मंगळवारी काँग्रेस आमदार शून्य तासाला शुन्याच्या आकाराचीच तीन अंडी घेऊन सभागृहात आले. अर्थात ही अंडी त्यांनी कोणत्याही वाईट हेतूने आणली नव्हती, तर प्लॅस्टीकची अंडी बाजारात आल्याचा दावा करून सभागृहाच्या नजरेस आणून देण्यासाठी त्यांनी ही कृती केली.
आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी मंगळवारी शून्य तासाला खिशातून अंडीच काडून दाखविली. हुबेहुब कोंबडीच्या अंड्यांसारखी दिसणारी ही अंडी कोंबडीची नसून ती प्लॅस्टीकची असल्याचा दावा त्यांनी केला. फोर्मेलीन युक्त मासळीनंतर आता प्लॅस्टिकची अंडी गोव्यातील बाजारात आल्याचे त्यांचे म्हणणे होते. तिन्ही अंडी त्यांनी सभापतीना दाखविली व या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, अशी मागणीही केली. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ही अंडी चाचणीसाठी प्रयोगशाळेत नेली जाणार असल्याचे सांगितले. मात्र, प्लॅस्टीकची अंडी असणे शक्यच नसल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले ''मी स्वतः अभियंता असल्यामुळे अंडी प्लॅस्टीकची असू शकत नाहीत एवढे मी ठामपणे सांगू शकतो. त्यावर रेजिनाल्ड यांनी अंड्यांचे इंजिनिअरिंग हा प्रकार कुठे नसल्याचे सांगितल्यामुळे सभागृहात आणि प्रेक्षकांच्या गॅलरीत हास्य कारंजेही उडाली. दरम्यान, अंडी चाचणीसाठी नेली जातील, असेही ते म्हणाले.