- पूजा नाईक प्रभूगावकरपणजी- राज्यात उकाडा वाढू लागल्याने सध्या लिंबू तसेच शहाळ्यांना मागणी वाढली आहे. पणजी बाजारात एक लिंबू ७ रुपयांनी तर शहाळे ५० रुपयांना एक या दराने मिळत आहे.
उकाडा असाच कायम राहिला तर लिंबू आणखीन महाग होऊन तो १० रुपयांपर्यंत जाईल अशी शक्यता लिंबू विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. यापूर्वी हेच लिंबू २० रुपयांना ५ ते ६ असे मिळायचे. पणजी बाजारात लिंबू हे कर्नाटक येथील बिजापूर येथून आयात केले जातात. मात्र तेथे अचानक पाऊस पडल्याने त्याची आवक घटली. त्यातच उकाडा वाढल्याने लिंबूंना मागणी वाढली. त्यामुळे लिंबू महागले आहेत.
उकाडयात लिंबू प्रमाणेच शहाळ्यांनाही मोठी मागणी असते. यापूर्वी ४० रुपयांना एक या दराने मिळणाऱ्या शहाळ्याच्या किंमतीत १० रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या पणजी बाजारात शहाळे ५० रुपयांना मिळत आहे.