पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी : राज्यात उकाडा वाढू लागल्याने लिंबू, शहाळे व कलिंगडाचे दर भडकले आहेत. पणजी बाजारात सध्या लिंबू ५० रुपयांना ५ म्हणजेच १० रुपयांना एक या दराने मिळत आहे. यावरऊन फळांनाही आता उकाड्याची झळ बसू लागल्याचे दिसत आहे.
मध्यंतरी लिंबू ८ रुपयांना एक मिळत होता. मात्र उन्हाळा वाढल्याने व लिंबूंना मागणी वाढल्याने यात आणखीन २ रुपयांनी वाढ झाली आहे. मध्यम आकाराचे लिंबू ५० रुपयांना पाच तर लहान आकाराचे लिंबू ५० रुपयांना ७ असे मिळत आहेत. मे महिन्यापर्यंत उकाडा कायम राहिल्यास लिंबाचे दर कमी होण्याची शक्यता नसल्याचे विक्रेते सांगत आहेत.
राज्यात साधारणत: मार्च, एप्रिल व मे हे तीन महिने उकाड्याचे असतात. सध्या सरासरी कमाल तापमान ३४ डिग्री सेल्सियस तर किमान तापमान २२.४ डिग्री सेल्सियस इतके नोंद होत आहे. त्यामुळे लिंबू सरबत, शहाळे, कलिंगड यांना लोकांकडून मागणी वाढत असल्याने त्यांचे दरही वाढले आहेत. पणजी बाजारात ४० रुपयांना एक या दराने मिळणारे शहाळे १० रुपयांनी महागले आहे. शहाळे ५० रुपये झाले आहे.