लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : बहुजन समाजाला आजही राज्यातील मंदिरांमध्ये गर्भ गृहप्रवेश करण्यापासून वंचित ठेवले जात आहे, अशी खंत व्यक्त करून प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले की, 'मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सनातन धर्माच्या रक्षणासाठी कटिबद्ध असल्यास परिवर्तन घडवून बहुजन समाजाला मंदिरांच्या गर्भगृहात प्रवेश मिळवून देण्याचे काम करावे. बहुजन समाजाला मंदिर प्रवेशाचा अधिकार ही काळाची गरज आहे.'
पत्रकार परिषदेत चोडणकर म्हणाले की, गोव्यात ओबीसी, अनुसूचित जाती- जमाती आणि इतरांचा समावेश असलेल्या बहुजन समाजाला मंदिरात प्रवेशापासून वंचित ठेवले जात आहे. काँग्रेस सर्व धर्मांचा आदर करते. सावंत यांनी सनातन धर्माच्या रक्षणासाठी कटिबद्ध असल्यास बहुजन समाजाला मंदिरात प्रवेश देण्याचे काम करावे. '
चोडणकर म्हणाले की, 'सनातन धर्मात बदल घडवून आणण्याची गरज आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी इतिहास अभ्यासावा आणि गोव्यात भाजपने जातीय सलोखा कसा बिघडवला है जाणून घ्यावे. भाजप सत्तेवर येण्यापूर्वी गोव्यात जातीय तणाव नव्हता. सावंत हे कधी ते पोर्तुगीजांवर वक्तव्य करतात, तर कधी मंदिरांवर वक्तव्य करतात' अशी टीका त्यांनी केली.