लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भारतीय जनता पक्षाच्या पणजी येथे झालेल्या बैठकीत लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकण्याचा निर्धार करण्यात आला. त्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचा, गाठीभेटी सुरू करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. मात्र, दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांची नावे ही लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच जाहीर करण्यात येतील, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिली.
पणजीत गुरुवारी भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, राष्ट्रीय सचिव विजयाताई रहाटकर, माजी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, दिगंबर कामत, दामू नाईक, मंत्री माविन गुदिन्हो, मंत्री आलेक्स सिक्वेरा आणि इतर पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत दोन्ही जागा जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. उमेदवारीबाबतीत कार्यकर्त्यांनी चिंता करण्याचे कारण नाही. योग्यवेळी उमेदवारही जाहीर केला जाईल. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर पक्षाचे संसदीय मंडळ उमेदवारांची घोषणा करेल, असे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले.
निवडणुकीसाठी तयारीला लागा. राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू करा, अशा सूचना कार्यकर्त्यांना करण्यात आल्या.
सरकारचे अभिनंदन
पक्षाच्या बैठकीत अनेक ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. गोवा सरकार विविध कल्याणकारी योजना अंतर्गत एकूण २.७० लाख महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दर महिना अर्थसहाय्य करीत असल्यामुळे सरकारच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. हा ठराव आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मांडला तर पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी त्याला अनुमोदन दिले. तसेच ५ राज्यातील विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करणारा ठरावही बैठकीत मंजूर करण्यात आला.
उमेदवारी मागणाऱ्यांना समजायला हवे...
उत्तर गोव्यासाठी इच्छुक उमेदवार म्हणून अनेक नेते पुढे येत आहेत, याबद्दल केंद्रीय राजमंत्री श्रीपाद नाईक यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी सांगितले की, उमेदवारी मागणाऱ्यांनी पक्षासाठी काम केले असल्यामुळे उमेदवारी मागण्यास काहीच हरकत नसावी, परंतु ती पक्षाच्या नियमांच्या चौकटीत राहून योग्य व्यासपीठावर मागावी, असेच मला म्हणायचे आहे. विद्यमान खासदाराचे काम असतानाही इतरांनी का उमेदवारी मागावी, असे विचारले असता ते म्हणाले की, ते मागणाऱ्यांना समजायला हवे.