पणजी : रोज कुरबुरी न करता मगो पक्षाने सरकारमधून बाहेर पडावे, सरकार पडू द्या, असे थेट आव्हान कला व संस्कृती खात्याचे मंत्री असलेले अपक्ष आमदार गोविंद गावडे यांनी सोमवारी येथे मगोपला दिले. दुस-याबाजूने मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी गावडे यांना जर कंटाळा आला तर त्यांनीच सरकारला सोडून जावे, कारण हे सरकार त्यांनी स्थापन केलेले नाही, असे प्रत्युत्तर दिले.मंत्री गावडे हे कला अकादमीचे चेअरमन या नात्याने अकादमीत नियोजित लोकोत्सवाविषयी पत्रकार परिषद घेण्यासाठी आले होते. पत्रकारांनी त्यांना सरकारमधील सध्याची स्थिती, प्रशासन व मगोपने विधानसभा पोटनिवडणूक लढविण्याचा घेतलेला निर्णय याविषयी विचारले असता, मंत्री गावडे म्हणाले की मगो पक्ष आता ब्लॅकमेलिंगच्याही पुढे पोहचलेला आहे. मगोपमधील काही अतिउत्साही कायम प्रकाशझोतात राहण्याचा प्रयत्न करतात. किंवा आपण कुणी तरी आहोत असेही त्यांना वाट असावे. त्यांनी रोज केवळ बोलत न राहता सरकारमधून बाहेर पडावे, सरकार पडल्यास पडू द्या, एकदाच काय तो सोक्षमोक्ष आम्ही लावूया.मंत्री गावडे म्हणाले, की मगो पक्ष संघटना आणि आमदार यांच्यात समन्वयच नाही. मगोपचा एक आमदार व नेता म्हणतो की, आपण सरकारसोबत आहोत. सरकार व्यवस्थित चाललेय. दुस:याबाजूने मगोपची केंद्रीय समिती हवे ते निर्णय घेते व पत्रकार परिषदही घेऊन सरकारविरोधी भूमिका मांडते. पक्षात काही सेन्सच राहिलेला नाही. कशाचाच ताळमेळ नाही. सत्ताधारी आघाडीच्या सर्व घटकांनी एकमेकाला समजून घेऊन पुढे जायला हवे. चर्चा करायला हवी. मगोप रोज जे ब्लॅकमेलिंग करतोय ते खूप झाले. त्या पक्षाने आता सत्ता सोडावी. उगाच पोकळ गोष्टी बोलू नये किंवा गमजा (फटाश्यो) मारू नये.मुख्यमंत्री पर्रीकर यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन सर्व अधिका-यांना काही सूचना केल्या, त्या वेळपासून प्रशासन सक्रिय होऊ लागले आहे. माझ्या तरी खात्यांबाबतची कामे होऊ लागली आहेत. नोकर भरती व व विशेषत: वीज खात्यातील भरती याविषयी मी आता बोलणार नाही. नोकर भरती ही गुणवत्तेच्या आधारे होत असते पण नंतर ती गुणवत्ता कशी ठरते ते मला ठाऊक नाही, असेही मंत्री गावडे म्हणाले.सरकार गोविंदने बनवले नाही : दीपक ढवळीकरदरम्यान, मगोपचे अध्यक्ष ढवळीकर यांनी लोकमतपाशी प्रतिक्रिया दिला. ढवळीकर म्हणाले, की विद्यमान सरकार गावडे यांनी घडवले नाही, त्यांनी फक्त सरकारला पाठींबा दिला आहे. ते कधीही पाठींबा काढून घेऊ शकतात. सरकार पडू दे असे ते म्हणतात म्हणजे त्यांना सरकारचा कंटाळा आला असेल. कंटाळा आल्यास त्यांनी स्वत:च सरकारला सोडून जावे. मगो पक्षाला सल्ला देण्याचा अपक्ष आमदाराला अधिकार नाही. मगोपने पोटनिवडणूक लढवायचे ठरवले म्हणून सरकार धोक्यात येते असे जर गावडे यांना वाटत असेल तर त्यांनी आताच सरकारला रामराम ठोकावा.
मगोपने सत्ता सोडावी, सरकार पडू द्या - मंत्री गावडे यांचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2019 6:10 PM