लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्यातून म्हादई नदी सदैव वाहू दे' असे देवाला गाऱ्हाणे घालून पाटो-पणजी येथे पर्यावरणप्रेमींनी महाआरती केली.
म्हादईचा लढा अधिक तीव्र करण्याच्या दिशेने बुधवारी (दि.२२) जागतिक जल दिनानिमित पणजीत म्हादई तसेच पर्यावरणप्रेमींनी ही महाआरती केली. यावेळी हिंदू ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मानुसार देवाकडे म्हादईचे रक्षण कर, म्हादईचा लढा गोवा जिंकू दे, म्हादई वाचवण्यासाठी जी काही अडचण आहे, ती दूर करावी' अशी प्रार्थना करण्यात आली.
यावेळी सेव्ह म्हादई-सेव्ह गोवाचे नेते अॅड. हृदयनाथ शिरोडकर, महेश म्हाम्ब्रे, तारा केरकर, प्रजल साखरदांडे, राजन घाटे, गोवा तृणमूल काँग्रेसचे नेते समील वळवईकर, तनोज वळवईकर, आमआदमी पक्षाचे नेते वाल्मिकी नायक, पर्यावरणप्रेमी फादर आतईद, शंकर पोळजी आदींसह नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी नारळ, केळी, पानाचा विडा मांडवी नदीत अर्पण करुन तसेच दिवे, मेणबत्ती लावून व आरती ओवाळून देवाला साकडे घातले.
अॅड. शिरोडकर म्हणाले, की गोव्याची जीवनदायीनी असलेली म्हादई संकटात आहे. तिला वाचवण्यासाठी हवे ते प्रयत्न होत नाही. सरकार न्यायालयीन लढा लढत असले तरी पुरेसे प्रयत्न होत नाही. म्हादई वाचवण्यासाठी आज राज्यभरात आंदोलन होत आहे. या लढ्याला आता अधिक बळ मिळण्याची गरज आहे. त्यामुळे आता देवाकडे या महाआरतीच्या माध्यमातून म्हादई वाचवा अशी प्रार्थना केली आहे. म्हादईचा लढा गोवा जिंके पर्यंत लढा सुरुच ठेवला जाईल. परिणामी तो अधिक तीव्र केला जाईल असा इशारा त्यांनी केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"