लोकमत न्यूज नेटवर्क डिचोली : स्वयंपूर्ण गोवा हे स्वप्न पूर्ण करण्याचा आमचा ध्यास आहे. या कार्यात युवकांनी विशेष पुढाकार घेताना आत्मनिर्भर व स्वावलंबी गोवा करण्याचा संकल्प करावा. सरकार विविध माध्यमातून सहकार्य करीत आहे. गावागावांतून त्याला प्रतिसाद मिळत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
न्हावेली येथे स्वयंपूर्ण गोवा मिशन अंतर्गत आधारकार्ड नोंदणी कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री सावंत बोलत होते. कालिदास गावस यांनी लोकांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड व इतर कागदपत्रे नियमित करून घ्यावीत. तसेच स्वयंपूर्ण होण्यासाठी उपलब्ध संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
युवकांनो उद्योजक बना व रोजगारही द्या
युवकांनी नोकरीमागे लागण्यापेक्षा रोजगार निर्माण करण्याची मानसिकता बाळगून स्वयंपूर्ण होऊन इतरांनाही सहकार्य करता येईल, अशी क्षेत्रे निवडून कार्यकुशलता वाढवा, असे आवाहन त्यांनी तरुणांना केले. व्यासपीठावर खात्याचे संचालक विजय सक्सेना, जिल्हा सदस्य गोपाळ सुलकर, सरपंच कालिदास गावस, पंचसदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वयंपूर्ण मिशनचे वाटेकरू व्हा
ग्रामीण भागातील युवा पिढी, ज्येष्ठ नागरिक, महिलांनी विविध माध्यमांतून सरकारच्या स्वयंपूर्ण मिशनचे वाटेकरू बनावे, यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रांत सामाजिक संस्था स्वयंपूर्ण मित्र यांना साथीला घेऊन अनेक उपक्रम हाती घेत आहोत. शेती लागवड, हरित धवल क्रांती, लघु उद्योग, महिला मंडळांच्या माध्यमातून खाद्यपदार्थ निर्मिती, फळ, फुले, भाजीपाला अशा सर्वच क्षेत्रांचा समावेश करून आम्ही उपक्रम सुरु केले आहेत. प्रत्येक बाबतीत आत्मनिर्भरता स्वयंपूर्णत: यावी व स्वप्न साकारण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"