लोकमत न्यूज नेटवर्क, माशेल: 'चला, वाचवूया म्हादई, हाक ऐकूया आईची, हे घोषवाक्य घेऊन नव्या दमात म्हादईसाठी प्राणपणाने लढा देऊया असे आवाहन आरटीआय कार्यकर्ते राजन घाटे यांनी केले. कुपा जुवे येथील मोटारसायकल रॅलीवेळी ते बोलत होते.
यावेळी हळदोनचे आमदार अॅड. कार्लस फेरेरा, प्रतिमा कुतिन्हो, पंच सुजत सिल्वेरा, तारा केरकर, मारियानो फेर्राव, लुकास रिबेरो व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. परब कुटुंबीयांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मोटारसायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली. यावेळी फादर बिस्मार्क यांच्या आठवणींना उजाळा देऊन आदरांजली वाहण्यात आली.
म्हादई ही गोमंतकीयांची जीवनदायिनी आहे. म्हादईचे पाणी बंद झाल्यास समुद्राचे खारे पाणी नदीच्या पात्रात जाऊन पिण्याचे पाणी, शेती बागायती, गोवेकरांचे मुख्य अन्न असलेल्या मासळी आणि एकूणच उदनिर्वाहावर परिणाम होईल. पर्यटन धोक्यात येईल. गोव्याची स्थिती बिकट होईल, असे घाटे म्हणाले.
सध्या संपूर्ण गोव्यात जे आगीचे तांडव चालू आहे, ते उष्णतेमुळे नव्हे तर ती मानव निर्मित आग आहे. सामान्य गोमंतकीयांची सुपीक जमीन बिल्डरांच्या घशात घालण्यासाठी रचलेले हे राजकीय नाटक आहे. पंचायत, देवस्थान, कोमुनिदाद व इतर अनेक संस्थानी म्हादईच्या समर्थनार्थ ठराव पास करण्याची गरज आहे, अशी मते या सभेत व्यक्त झाली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"