लोकमत न्यूज नेटवर्क पेडणे : राम मंदिराचे स्वप्न साकार झाले, आता आदर्श रामराज्य आणण्याचा संकल्प करूया, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केले. पार्से येथील देवी भगवती मंदिराच्या प्रांगणात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर, पार्सेचे सरपंच अजय कळंगुटकर, सत्कारमूर्ती साबासाहेब देसाई उपस्थित होते.
प्रा. पार्सेकर पुढे म्हणाले, देशवासीयांना आदर्श असलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिराचे स्वन सत्यात आले. मात्र, या मंदिराच्या अस्तित्वासाठी हजारो कारसेवकांना आपले प्राण गमवावे लागले. स्वतःच्या जिवाची पर्वा न करता अनेकजण या कारसेवेत सहभागी झाले होते. आजची उत्सवमूर्तीसुद्धा त्यातील एक आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे त्यावेळी ही कारसेवा करण्याची संधी मला मिळाली.
आज आपले मंदिराचे स्वप्न साकार झाले त्याचे साक्षीदार होता आले. येणाऱ्या पिढीला श्रीरामाच्या आदर्शाचे दर्शन होण्यासाठी रामराज्य प्रत्यक्षात येणे काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सुरुवातीला भगवती देवस्थानचे अध्यक्ष तथा विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते साबासाहेब देसाई यांचा कारसेवक म्हणून शाल, श्रीफळ आणि श्रीराम मंदिराची प्रतिकृती देऊन सत्कार करण्यात आला. विठोबा बगळी यांनी सूत्रसंचालन केले व शेवटी आभार मानले. यावेळी श्रीरामभक्त व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.