पणजी : राफेलविषयी संसदेत चर्चा तरी होऊ द्या, काँग्रेस पक्ष संसदेत चर्चाही होऊ देत नाही, असे भाजपाचे केंद्रीय नेते व राज्यसभा खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी मंगळवारी येथे सांगितले. विनय सहस्रबुद्धे यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत मंत्री मिलिंद नाईक, माजी आमदार सुभाष फळदेसाई व किरण कांदोळकर उपस्थित होते.
विनय सहस्रबुद्धे म्हणाले, की काँग्रेस पक्ष राफेलच्या व्यवहारांची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी होऊ द्या अशी मागणी करतो पण तत्पूर्वीच हा विषय काँग्रेसने न्यायालयात नेला. तिथे न्यायालयाने व्यवहारांमध्ये संशय घेण्यासारखे काही नाही असे सांगितले. तसेच केंद्र सरकारने राफेल खरेदी प्रकरणी कोणतीच बेकायदा कृती केलेली नाही हेही न्यायालयीन निवाड्यातून स्पष्ट होत आहे. निवाड्यामध्ये जी शब्दाची तांत्रिक चूक राहिली, त्याचा विरोधी काँग्रेस पक्ष आता बाऊ करून लोकांमध्ये संशय निर्माण करू पाहत आहे. मात्र काँग्रेसच्या त्या अपप्रचाराविरुद्ध भाजपा देशभर मोहीम राबवणार आहे. 19 रोजी देशभर भाजपाचे धरणे कार्यक्रमही होतील.
विनय सहस्रबुद्धे म्हणाले, की कोणताच घोटाळा न करता केंद्र सरकार चार वर्षे अधिकारावर राहिलेच कसे, असा प्रश्न काँग्रेसच्या नेत्यांना पडलेला असेल. कारण काँग्रेसच्या कारकिर्दीतील भ्रष्टाचाराचा आरंभ हा स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या काळापासून होतो. नंतर स्व. नरसिंहराव सरकारमध्येही खासदार खरेदीची प्रकरणे घडली. केंद्रात भाजपाचे सरकार अधिकारावर आल्यानंतर संरक्षणविषयक व्यवहारांमधील दिल्लीतील दलालीचे व्यवहार पूर्णपणे बंद झाले. त्यामुळेही काँग्रेसला वाईट वाटले असावे.
दरम्यान, राफेलबाबतच्या काँग्रेसच्या अपप्रचारामुळे तीन राज्यांमध्ये भाजपाच्या हातून सत्ता गेली, असा निष्कर्ष काढण्याची घाई आपण करणार नाही, असे विनय सहस्रबुद्धे यांनी सांगितले.