पणजीः कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे आणि सभापती रमेश तवडकर यांच्यामधील वाद अत्यंत गंभीर टप्प्यावर पोहोचले असले तरी हे अंतर्गत वाद असल्याचे प्रदेशाध्यक्ष खासदार सदानंद शेट. तानवडे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांची भेट. घेऊन हा वाद सोडविला जाईल असेही त्यांनी म्हटले आहे. दोघांमधील वाद विकोपाला गेल्यामुळे आता तानवडे यांना मध्यस्ती करावी लागली आहे.
गोवा विधानसभेचे अधिवेशन सुरू असतानाच सभापती तवडकर यांनी गावडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे अत्यंत गंभीर आरोप केल्यामुळे विरोधकांना आयतेच कोलीत मिळाले आहे. अशातच तवडकर आणि गावडे यांच्यातही आता एकमेकाविरुद्ध आरोपप्रत्यारोपांचे वाक् युद्ध सुरू झाले आहे. या पार्श्वभुमीवर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तानवडे यांना या विषयी प्रसार माध्यमांनी विचारले असता त्यांनी हा वाद पक्षांतर्गत असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने हा वाद लवकरच मिटविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
काणकोण मतदारसंघातील १३ संस्थांना वाटप करण्यात आलेल्या एकूण २६ लाख रुपयांच्या निधीच्या मुद्द्यावरून हा वाद उफाळला होता. खोतीगांवच्या काही. पंच सदस्यांनी यात मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप केला होता. तवडकर यांनीही या आरोपांचा दुजारा देणारे वक्तव्य केले होते. मंत्री गावडे यांनी हे आरोप फेटाळताना आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष या नात्याने यात तानवडे यांना हस्तक्षेप करावा लागला आहे.