मडगाव : गोव्यात होऊ घातलेल्या सहा नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाला सर्व स्तरांतून वाढता विरोध होत असतानाच या प्रकल्पाला गोव्यातील काँग्रेसनेही विरोध केला आहे. केंद्र सरकारने हा प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी करणारे पत्र गोव्यातील काँग्रेसने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पाठविले आहे.विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी सोमवारी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नद्यांचे राष्ट्रीयीकरण केल्यास या नद्यांच्या काठावर रहाणा-या मच्छीमारांच्या अधिकारावर गदा येणार असून त्यामुळेच हा लोकविरोधी निर्णय रद्द करावा अशी मागणी केली आहे. येत्या विधानसभा अधिवेशनापर्यंत या मागणीवर केंद्राकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा कवळेकर यांनी यावेळी व्यक्त केली. अन्यथा काँग्रेस आपले पुढील धोरण स्पष्ट करणार असे ते म्हणाले. यावेळी काँग्रेसचे आमदार व प्रवक्ते आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हेही उपस्थित होते. गोव्यातील झुवारी व मांडवी या दोन प्रमुख नद्यांसह एकूण सहा नद्यांचे जलमार्गाचे राष्ट्रीयीकरण होणार असून आतार्पयत गोव्यातील 190 पैकी 90 पंचायतींच्या ग्रामसभांमध्ये या निर्णयाला तसेच कोळसा हबला विरोध केलेला आहे. या वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळाने आपली अधिकृत भूमिका केंद्रीय मंत्री गडकरी यांना कळविली आहे. सोमवारी स्पीडपोस्टने हे पत्र पाठविल्याची माहिती कवळेकर यांनी दिली. गोव्यात रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली कोळशाच्या वाहतूकीला उत्तेजन देण्याचे कारस्थान शिजत असल्याचा संशय व्यक्त करीत यामुळे संपूर्ण राज्यात लोकांमध्ये एकप्रकारचे साशंकतेचे वातावरण पसरले आहे. स्थानिकांना विश्वासात न घेता जर केंद्र सरकारने हा प्रस्ताव पुढे नेल्यास गोव्यात आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा रस्ता रुंदीकरणाला विरोध नाही मात्र हे रुंदीकरण नेमके कशासाठी केले जाते हे लोकांना कळले पाहिजे. या प्रश्नात काँग्रेस लोकांबरोबर राहील असे कवळेकर म्हणाले.
गोव्यातील नद्यांचे राष्ट्रीयीकरण रद्द करण्यासाठी काँग्रेसचे नितीन गडकरी यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 7:02 PM