लोकमत न्यूज नेटवर्क, गुळेली: राज्यातील काही खासगी इस्पितळात येणाऱ्या रुग्णांवर शेवटच्या क्षणापर्यंत उपचार करतात. त्या रुग्णाची प्रकृती प्रचंड खालावल्यानंतर त्यांना गोमेकॉ नेण्यास सांगितले जाते. यापुढे खासगी इस्पितळांनी असा प्रकार केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करूच, प्रसंगी परवाना रद्द करण्याचा इशारा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी काल दिला.
खोतोड़ा-सत्तरी येथे रविवारी महाआरोग्य तपासणी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर वाळपई सरकारी आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. विकास नाईक, डॉ. श्याम काणकोणकर, डॉ. वैभव गाडगीळ, अकीब शेख, संयोजक विनोद शिंदे, आरोग्य संचालिका डॉ. गीता काकोडकर, डॉ. गीता देशमुख, केदार रायकर, प्रशांत सूर्यवंशी, खोतोडा सरपंच नामदेव राणे. नंदिनी म्हाळशेकर, सलोनी गावकर तसेच इतर पंच, नगरगाव जिल्हा पंचायत सदस्य राजेश्री काळे, श्रीराम हायस्कूलचे मुख्याध्यापक शिवाजी देसाई उपस्थित होते.
गोव्यातील काही खासगी रुग्णालये त्यांच्याकडे उपचारासाठी आलेल्या रुग्णांवर शेवटच्या टप्प्यापर्यंत उपचार करतात आणि नंतर त्यांना जीएमसीकडे पाठवतात. परिणामी रुग्ण औषधोपचारांना आवश्यक तसा प्रतिसाद देत नाही. रुग्णांची प्रकृती खालावलेल्या परिस्थितीत जी खासगी रुग्णालयात रुग्णांना जीएमसीकडे १ पाठवतात त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. तसेच आवश्यकता भासल्यास अशा परवानेदेखील निलंबित केले जातील, असा इशाराही राणे यांनी दिला.
रुग्णालयांचे त्यामुळे यापुढे खासगी इस्पितळांच्या बाबतीत नियमावली आखली जाणार आहे. यामध्ये रुग्णांचे हेळसांड करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशाराही मंत्री राणे यांनी दिला आहे.
राणे म्हणाले...
सत्तरी तालुक्याबरोबर पेडणेपासून ते काणकोणपर्यंत सामान्य माणसांना आरोग्यांची चांगल्या प्रकारची सोयीसुविधा निर्माण करण्यावर भर दिली जात आहे. आरोग्य क्षेत्रात गोव्यात क्रांती घडत आहे. सरकारच्या माध्यमातून जनतेच्या दारात आरोग्य सेवा पुरविण्याचा प्रयत्न आहे. ज्या ज्या ठिकाणी आरोग्य सेवा देण्याची गरज आहे त्या ठिकाणी सुविधा पुरवली जाणार आहे. गोमेकॉत दंतचिकित्सा इस्पितळ नवे बांधण्यात आले आहे. या माध्यमातून नागरिकांना चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
आरोग्यसेवेत आमूलाग्र बदल
केंद्राच्या माध्यमातून राज्यात नर्सिंग कॉलेजसाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच नवीन मेडिकल कॉलेजसाठीही प्रयत्न केले जातील. सामान्य जनतेला मोफत आरोग्य सेवा पुरविल्या जातील. सत्तरीच्या ग्रामीण भागात विविध भेडसावणाऱ्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. ग्रामीण भागात गेल्या दोन महिन्यांपासून आरोग्य शिबिरे सुरु आहेत. तेथील लोकांना आरोग्य सेवा, सुविधा मिळायला हव्यात. आरएमडी केंद्रात ही रुग्णवाहिका ठेवलेल्या आहेत. केंद्राच्या सहकार्याने गोव्याच्या आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणले जातील, असेही राणे म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"