पणजी - भारतीय आयुर्विणा महामंडळ लवकरच कर्करोगावरील उपचारासाठी विशेष विमा योजना जाहीर करणार असल्याची माहिती महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक राजेशी मिड्डा यांनी पणजीत पत्रकार परिषदेत बोलताना दिली. ७२ व्या वर्षपूतीर्निमित्त भारतीय आयुर्विमा महामंडळातर्फे अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. भारतीयांचे आयुर्मान हे ५० वर्षे वयावरून वाढून ७० वर्षांवर येवून ठेपले आहे, परंतु वाढत्या वयात अनेक आजारही होत आहेत. त्यात सर्वात गंभीर आणि मोठ्या प्रमाणावर म्हणजे २७ टक्के इतक्या वेगाने कर्क रोग वाढत असल्याची भारतीय कॅन्सर सोसायटीची आकडेवारी सांगते. त्यामुळे कर्करोग उपाचरासाठीची विमा योजना महामंडळाने बनविली असून ती लवकरच जाहीर केली जाणार आहे असे मिड्डा यांनी सांगितले. गोव्यात महामंडळाच्या ११ शाखा आहेत. तीन सेटलाईट कार्यालये, १ ग्राहक विभाग अणि ३ लहान कार्यालये आहेत. एकूण ११.६३ लाख विमा उतरविण्यात आल्या आहेत. चालू वर्षातही महामंडळाने १८ हजाराहून अधइक नवीन पॉलीसी केल्या आहेत. राज्यात वर्षा काठी १०९२८ कोटी रुपये एवढी उलाढाल असल्याची माहितीही मिड्डा यांनी दिली. विमा उतरविण्याला जसा लोकांकडून महामंडळाला प्रचंढ प्रतिसाद दिला जातो तसाच विम्याचा लाभ देण्यासाठीही महामंडळाकडून तत्परता दाखविली जात आहे. एक ते ५ दिवसात प्रकरणे धसाला लावली जातात. चालू वर्षात राज्यात २५८९ दावे निकालात काढून एकूण ३८.१७ कोटी रुपये वितरीत केल्याची माहिती त्यांनी दिली. देशत २००१ साली खाजगी कंपन्यांना विमा क्षेत्र खुले करण्यात आले तेव्हापासून कित्येक मोठमोठ्या कंपन्या स्पर्धेत उतरल्या. त्यावेळी भारतीय आयुर्विमा मंडळाच्या भवितव्याबद्दल जरा अस्वस्थता निर्माण झाली होती, परंतु लोकांचा महामंडळावरील विश्वास कायम राहिला. आजही देशात ७५ टक्के वाटा हा भारतीय आयुर्विमा महामंडळाचा आहे असे ते म्हणाले.
एलआयसीची लवकरच कर्करोग उपचार विमयोजना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2018 6:24 PM