लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पावसाचा परतीचा प्रवास सुरू असताना धारण केलेला रुद्रावतार कालही कायम होता. शनिवारी पुन्हा पावसाने झोडपून काढले. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या, रस्ते बुडाले, झाडे पडली. तर धरणे तुडुंब भरल्याने पाणी सोडावे लागले. या पावसाळ्यात एकूण १३३ इंच पावसाची नोंद झाली असून, १२ टक्के अतिरिक्त पाऊस यंदा पडला.
यंदा सर्वाधिक पाऊस पडलेल्या केपे तालुक्यातही जोरदार सरी सुरूच आहेत. पारोडा येथील रस्ता पुन्हा पाण्याखाली गेला असून, मडगावहून केपेला जाणारी वाहतूक चांदरमार्गे वळविण्यात आली आहे. पाऊस असाच चालू राहिल्यास दुर्घटना होण्याची शक्यता असून, हवामान खात्यानेही सतर्कतेचा इशारा दिला आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत इतका जोरदार पाऊस पडण्याची अलीकडच्या चार दशकांतील पहिलीच वेळ असल्याची माहिती हवामान खात्याच्या सूत्रांकडून देण्यात आली. या दोन महिन्यांनी अनेक विक्रम तोडले आहेत.
भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या प्रारंभिक अंदाजानुसार देशात यंदा ५ टक्के कमी पाऊस पडणार असल्याचे म्हटले होते. काही प्रदेश वगळता संपूर्ण देशात यंदा ६ टक्के तुटीचा पाऊस पडला आहे. मात्र, गोवा याला अपवाद ठरला असून, १२ टक्के अतिरिक्त पाऊस गोव्यात यंदा पडला आहे. 'एल निनोचा प्रभाव गोव्याला जाणवलाच नाही, असेच यावरून स्पष्ट झाले आहे.
अरबी समुद्रात काय शिजतंय?
गोव्याच्या किनारपट्टीपासून १३० किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. तो अधिकच तीव्र होत असून, तो ईशान्येच्या दिशेने सरकत असल्यामुळे भारतीय किनारपट्टीला ही सिस्टम धडक देणार आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात जोरदार पाऊस पडत आहे.
कारला अपघात चालक जागीच ठार
मेडक शिरवई, केपे येथे झालेल्या स्वयंअपघातात मूळ झारखंड येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. कारमधून पाचजण जात होते. पाऊस सुरु असताना चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने अचानक वाहन रस्ता सोडून खोल भागात पडल्याने चालक जागीच ठार झाला, अशी माहिती कुडचडे अग्निशमक दलाचे अधिकारी दामोदर जभिवलीकर व पोलिस निरीक्षक दीपक पेडणेकर यांनी दिली. कारमधील इतर चौघे जखमी झाले आहेत.
पारोडा रस्ता पाण्याखाली
गेल्या ३६ तासांत केपे, सांगे तालुक्याला मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. पारोडा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करावा लागला. यावेळी या रस्त्यावरची वाहतूक चांदोरमार्गे वळविण्यात आली.
दोन घरांचे नुकसान
मुरगाव तालुक्यातील रुमडावाडा, सहा येथील डोंगराळ भागातून दरड कोसळल्याने दोन घरांचे नुकसान झाले. दरड कोसळत असताना घरात लोक होते; मात्र सुदैवाने जीवितहानी टळली, त्याचबरोबर तालुक्यातील विविध भागांत तीन झाडे कोसळली; तर दोन झाडे धोकादायक पद्धतीने पायामुळे वाकली आहेत. नवेवाडे, चिखली, मेरशी चाडे तसेच बायणा येथे पडझडीच्या घटना घडल्या.
बार्देशातही पडझड
तालुक्यातही अनेक ठिकाणी झाडांची पडझड होण्याचा प्रकार घडला आहे. विविध घटनांतून अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. हणनूण, करासवाडा, दत्तवाडी, गिरी येथे झाड पडण्याच्या घटना घडल्या; तर मुसळधार पावसामुळे कोलवाळ परिसरात दोन दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरु आहे.
धरणे ओव्हर फ्लो
तीन दिवस पडलेल्या जोरदार पावसामुळे सर्व ६ धरणे तुडुंब भरून वाहू लागली आहेत. अंजुणे धरणाची चारही दारे खुली करून पाणी सोडावे लागले. जुलै महिन्यातच गोव्यातील सर्व धरणे भरून गेली होती. परंतु जुलैचा पंधरवडा आणि संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेल्यामुळे सर्व धरणांची पातळी खाली आली होती. सप्टेंबर अखेरीस पावसाने पुन्हा झोडपून काढल्यामुळे धरणे भरून गेली आहेत. साळावली धरण १०७ टक्क्यांहून अधिक भरले आहे. चापोली व आमठाणे येथील धरणे १०० टक्के भरली आहेत तर पंचवाडी आणि गावणे धरण १०१ टक्के भरले आहे.
'अंजुणे'चे चारही दरवाजे खुले
अंजुणे धरण परिसरात दिवसभरात तब्बल १०७ मि.मी. पावसाची नोंद झाली, त्यामुळे या धरणाचे चारही दरवाजे खुले करण्यात आले आहेत. पावसाचा जोर लक्षात घेता हा विसर्ग सुरू आहे. धरणाची पातळी ९३.२८ मीटरपर्यंत तुटुंब भरलेली आहे. आतापर्यंत धरण परिसरात ४२०८.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. अजूनही पावसाची संततधार सुरु आहे. आमठाणे धरण ही तुडुंब भरलेले आहे. अतिरिक्त पाणी विसर्ग सुरू आहे. तालुक्यात गेले काही दिवस मुसळधार पाऊस सुरु असल्याने सखल अनेक भाग जलमय झाले आहेत. मात्र, मोठी हानी आलेली नाही.
दिवस संपले, पावसाळा सुरूच
पावसाळ्याच्या शेवटच्या दिवशी ३० सप्टेंबरला हवामान खात्याला केसरी अलर्ट मागे घेऊन लाल अलर्ट जारी करावा लागला. रविवारसाठी केसरी अलर्ट जारी करण्यात आला आहे. म्हणजेच पावसाळा संपला तरी अजून जोरदार पाऊस पडणार आहे.