पणजी : गोव्याच्या किना-यांवर जीवरक्षकांची सेवा देणा-या दृष्टी लाइफ सेविंग कंपनीचे कंत्राट सरकारने ३0 जून २0२२ पर्यंत वाढविले आहे. काही जीवरक्षक संपावर आहेत. २00८ साली राज्य सरकारने ‘दृष्टी’शी करार केला तेव्हापासून किना-यांवर जीवरक्षक तैनात असून किना-यांवर कोणी बुडत असल्यास त्यांचा जीव वाचविण्याचे काम हे जीवरक्षक करीत असतात. २00८ पासून किना-यांवर बुडून मृत्यू होण्याचे प्रमाण ९९ टक्क्यांनी घटल्याचा दावा केला जात आहे. आतापर्यंत ५ हजारांहून अधिक जणांचे प्राण वाचविण्यात आल्याचा दावा कंपनीचे कार्यकारी संचालक रविशंकर यांनी केला. यापूर्वीची आमची कामगिरी पाहूनच गोवा सरकारने विश्वास ठेवून कंत्राट वाढवून दिल्याचे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, ९0 टक्के गोमंतकीयांना सेवेत घेण्याची निविदेतील अटीचे पालन आम्ही करत असतो. स्पेशल ट्रेनिंग अकादमीतर्फे जीवरक्षकांना प्रशिक्षण दिले जाते.
‘संपकरी जीवरक्षकांना न्याय द्या’
दरम्यान, संपकरी जीवरक्षकांच्या आंदोलनाचे नेतृत्त्व करणा-या स्वाती केरकर यांनी यावर नाराजी व्यक्त केली असून याआधी १४४ कोटी रुपये कंपनीला फेडले तेव्हा कंपनीने कंत्राटाच्या अटींचे पालन केले होते का?, असा सवाल केला आहे. नव्या कंत्राटावर कोणी सह्या केलेल्या आहेत, हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे, असे त्या म्हणाल्या. संपकरी जीवरक्षकांना पुर्ववत् सेवेत घेण्यास कंपनीला भाग पाडावे तसेच त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी केरकर यांनी केली आहे. याआधी कंपनीकडून जीवरक्षकांची पगारासाठी वेळोवेळी अडवणूक करण्यात आलेली आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले. सुमारे ३00 जीवरक्षक संपावर आहेत आणि त्यांनी पर्यटन भवनावर धडक देऊन खात्याच्या संचालकांना दोन दिवसांपूर्वी निवेदनही दिले आहे.