लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : दृष्टी मरीनच्या जीवरक्षकांनी गेल्या दोन वर्षांत राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर ९१ मुलांना बुडताना वाचवले. त्यांच्या या कामाबद्दल गोवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने (जीएससीपीसीआर) एजन्सीच्या जीवनरक्षकांची धाडसी कृती अशा शब्दात कौतुक केले आहे.
'जीवरक्षक आपल्या सर्वांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी जीवन समर्पित करतात. ते मुलांना दुखापत टाळण्यासाठी आणि त्यांना जीवघेण्या अपघातांपासून वाचवण्यासाठी सूचना देतात. त्यांच्यावर सतत लक्ष ठेवतात,' असे म्हणत बोर्जेस यांनी जीवरक्षकांच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे.
'लहान मुलांसाठी समुद्रकिनारे सुरक्षित आहेत याची खात्री करण्याची आणि पोहण्याचा आनंद घेत असताना जीवरक्षक मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी पेलतात. ९१ मुलांची सुटका करण्यासाठी जन्मलेल्या मुलांवर प्राथमिक उपचार करणेदेखील समाविष्ट होते' असे राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
आयोगाच्या या पत्राबाबत दृष्टी मरीनचे सीईओ नवीन अवस्थी म्हणाले, 'राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर लहान मुलांसह सर्वांना सुरक्षित ठेवण्यासाठी आमच्या जीवरक्षकांच्या अथक प्रयत्नांची दखल घेतल्याबद्दल आम्ही जीएससीपीसीआरचे आभार मानतो. आमचे जीवरक्षक हे किनाऱ्यावरील सर्व आपत्कालीन परिस्थितीत प्रथम प्रतिसाद देतात. राज्यातील सर्व किनाऱ्यांवर कोणतीही आपत्ती घडू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सर्व प्रशिक्षित जीवरक्षक खबरदारी घेत आहेत. असे त्यांनी सांगितले.
हरवलेली २६४ मुले पालकांच्या स्वाधीन
काही दिवसांपूर्वी जीवरक्षकांनी मांद्रे समुद्रकिनाऱ्यांवर दोन फ्रेंच मुलांची सुटका केली होती. त्याची दाखल घेत बालहक्क आयोगाचे अध्यक्ष पीटर बोर्जेस यांनी दृष्टी मरीनचे मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन अवस्थी यांना पत्र पाठवले आहे. दृष्टीच्या जीवरक्षकांनी राज्यातील समुद्र किनाऱ्यांवर तीन वर्षांमध्ये आई- वडिलांपासून दुरावलेल्या २६४ मुलांचा शोध घेतला. त्यांना त्यांच्या पालकांची भेट घडवून आणली, ही बाब कौतुकास्पद आहे, असे अध्यक्ष बोर्जेस यांनी म्हटले आहे.