पणजी : राज्यातील विविध समुद्र किनाऱ्यांवर दसरा सणाच्या निमित्ताने पर्यटनासाठी आलेल्यांपैकी २७ जणांना ‘दृष्टी मरीन’च्या जीवरक्षकांनी जीवदान दिले. यामध्ये प्रसिद्ध दुधसागर धबधब्यावर बुडणाऱ्या एका महिलेला आणि मुलाला वाचवण्यात आले. तर मांद्रे समुद्रकिनारी एका रशियन महिला आणि पाळोळे किनारी बुडणाऱ्या कायाकिंग करणाऱ्यास जीवदान दिले.
कोलकाता येथील एक महिला आणि तिची ११ महिन्यांची मुलगी खडकावर दूधसागर धबधब्यात घसरले. पाण्यात बुडालेल्या दोघांना वाचविण्यासाठी जीवरक्षकांनी प्रयत्नांची शर्थ केली. महिलेला पाण्यातून बाहेर काढले. त्याचवेळी जीवरक्षक बाबू गवळी यांनी रेस्क्यू बोर्डच्या मदतीने पाण्यात झुंजत असलेल्या अर्भकाला वाचवले.
मांद्रे किनाऱ्यावर एका ५५ वर्षीय रशियन महिलेला समुद्राच्या खोल भागात उग्र प्रवाहाने खेचल्यानंतर वाचवण्यात आले. दृष्टीचे जीवरक्षक सखाराम बांदेकर यांनी सर्फबोर्डच्या सहाय्याने या महिलेला वाचवले. तर राज्यातील मोठ्या लाटेतून दोघा पुरुषांना नागेश बर्गे आणि नूतन मोटे या जीवरक्षकांनी रेस्क्यू ट्यूब आणि जेट स्कीच्या मदतीने किनाऱ्यावर आणले. तर शिवोलीतील २८ वर्षीय एकाला समुद्र किनारी वाचवण्यात आले. पाळोळे येथे कयाकिंग करणाऱ्या कर्नाटकातील एका ४३ वर्षीय व्यक्तीची कयाक उलटली. जीवरक्षक नीलेश वेळीपने तातडीने मदत करत त्यांना सुखरूप किनाऱ्यावर आणले.हरमल येथील गोड्या पाण्याच्या तलावाजवळ बेंगळुरू येथील २९ वर्षीय महिला कुटुंबासह पोहत असताना पाण्यात ओढली गेली आणि बुडू लागली. जीवरक्षक संदीप म्हापणकर आणि चेतन बांदेकर यांनी सर्फबोर्ड आणि रेस्क्यू ट्यूब वापरून या महिलेला किनाऱ्यावर आणले. या किनाऱ्यावर महाराष्ट्रातील एक २५ वर्षीय युवक रिप करंटमध्ये अडकला होता. त्याला जीवरक्षक नितेश गाडेकर आणि संदीप म्हापणकर यांनी सर्फ बोर्ड आणि रेस्क्यू ट्यूब वापरून वाचवले.
बागा बीचवर तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये खोल समुद्रात ओढले गेलेल्या कर्नाटकातील ३१ वर्षीय पुरुष, आंध्र प्रदेशातील ३३ वर्षीय पुरुष आणि रशियातील ३६ वर्षीय व्यक्तीची सुटका करण्यात आली. रेस्क्यू ट्यूब, सर्फ बोर्ड आणि जेट स्कीच्या मदतीने त्यांची सुटका करण्यात आली. माजोर्डा, अगोंद किनाऱ्यावर हैदराबादमधील ४९ वर्षीय आणि हरियाणातील २९ वर्षीय महिलेची सुटका करण्यात आली. याच किनाऱ्यावर १५ व १६ वर्षीय साळावली येथील दोन स्थानिक मुलांना जीवरक्षक श्याम दास आणि यल्लेश बागडी यांनी रेस्क्यू ट्यूबच्या मदतीने वाचवले.
कळंगुट किनाऱ्यावर सर्वाधिक बचावकार्य
कळंगुट किनाऱ्यावर ११ जणांना वाचवण्यात आले. बचावकार्य करण्यात आले. यामध्ये चार घटनांमध्ये दोघा-दोघांचा समावेश होता. त्यापैकी सहा जण कर्नाटकातील रहिवासी होते. खडबडीत समुद्रात हे लोक खोल समुद्रात खेचले गेले होते. पोहता येत नसणाऱ्या या पर्यटकांना जीवरक्षक लेस्ली रॉड्रिग्ज, साजन नागवेकर, सुहास पाटील, नकुल उसपकर आणि अजय कांबळे यांनी वाचवले. किनाऱ्यावर एका घटनेत ४२ आणि ५२ वर्षीय स्थानिकांना वाचवण्यात आले. हे दोघे दुर्गा मूर्तीचे विसर्जन करताना पाण्यात बुडत होते. जीवरक्षकांनी या दोघांचीही सुटका केली. याशिवाय येथे एकाचवेळी १७ वर्षे, १८ वर्षे आणि २० वर्षीय कर्नाटकातील तरुणांना वाचविण्यात आले.
तातडीने प्राथमिक उपचार
दृष्टीच्या जीवरक्षकांनी कांदोळी किनाऱ्यावर बेंगळुरू येथील एकावर आणि केरी किनाऱ्यावर रशियन नागरिकावर प्रथमोपचार केले. या रशियन नागरिकाच्या दुचाकीवर झाड कोसळून त्यांच्या पायाला दुखापत झाली. जीवरक्षकाने परदेशी नागरिकांवर तातडीने प्राथमिक उपचार केले.