लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : गोमेकॉ अत्याधुनिक साधन- सुविधांनी दिवसेंदिवस विकसित होत चालले आहे. राज्याच्या दृष्टीने ही कौतुकास्पद बाब आहे. पण याचबरोबर गोमेकॉवरील ताणही वाढला आहे. त्यामुळे दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात गोमेकॉप्रमाणे साधनसुविधा पुरवल्या तर गोमेकॉवरील ताण निश्चितच कमी होईल. सरकारने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी आमदार दिगंबर कामत यांनी काल विधानसभेत केली.
गोमेकॉ एवढे प्रसिद्ध आहे की, सावंतवाडी, कारवारसह इतर भागातील लोक येथे उपचारासाठी येत असतात. त्यामुळे गोमेकॉवर ताण वाढत आहे. जर जिल्हा हॉस्पिटल साधन-सुविधांनी सज्ज केले तर दक्षिणेतील अनेक लोक गोमेकॉत न येता तिथेच उपचार घेतील, असे कामत यांनी सांगितले.
या हॉस्पिटलकडे सध्या खूप दुर्लक्ष होत आहे. येथे कुठल्याच प्रकारची मोठी सुविधा उपलब्ध नाही. कर्मचारी, डॉक्टर्सदेखील तुलनेत कमी आहेत. अशावेळी या हॉस्पिटलचा दक्षिणेतील लोकांना काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे लोकांना प्रवास करून गोमेकॉत यावे लागते. आरोग्यमंत्र्यांनी या प्रश्नी लक्ष घालून ही समस्या सोडवावी, असेही कामत म्हणाले.
गांभीर्याने लक्ष द्या...
दक्षिण गोवा इस्पितळ सुसज्ज करण्याची मोठी गरज आहे. आरोग्य खात्याने या इस्पितळाच्या अवस्थेकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करावी. हे इस्पितळ अद्ययावत झाल्यास गोमेकॉवरील मोठा ताण कमी होणार आहे, असे दिगंबर कामत यांनी सांगितले.