उत्तरेत रमाकांत खलप तर दक्षिणेत गिरीश चोडणकर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2024 08:53 AM2024-04-02T08:53:48+5:302024-04-02T08:55:29+5:30
काँग्रेस आज नावे जाहीर करणार : माणिकराव ठाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी:काँग्रेसचे दोन्ही उमेदवार निश्चित करण्यासाठी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत काल, सोमवारी खल झाला. उत्तर गोव्यातून रमाकांत खलप व दक्षिण गोव्यातून गिरीश चोडणकर यांची नावे आघाडीवर असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
दक्षिणेच्या उमेदवारीची माळ चोडणकर यांच्या गळ्यात पडल्यास प्रथमच येथे काँग्रेसने ख्रिस्ती उमेदवार देण्याच्या परंपरेला फाटा दिल्यासारखे होईल. भाजपने पल्लवी धंपे यांच्या रुपाने हिंदू महिला उमेदवार दिल्याने काँग्रेस पुन्हा खिस्ती चेहराच देईल, अशी अटकळ बांधण्यात येत होती. विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन, कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांची नावे चर्चेत होती.
परंतु आता काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचे नाव पुढे आले आहे. उत्तर गोव्यातून माजी केंद्रीय कायदा मंत्री अॅड. रमाकांत खलप यांच्याबरोबरच सुनील कवठणकर यांचेही नाव चर्चेत होते. परंतु खलप यांचे नाव आघाडीवर आहे
विजय सरदेसाई वेणुगोपालांना भेटले
गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी सार्दिन यांच्या नावाला याआधीच जाहीरपणे विरोध केला आहे. सार्दिन यांना तिकीट दिल्यास गोवा फॉरवर्ड इंडिया आघाडीच्या उमेदवारासाठी काम करणार नाही, असे त्यांनी काँग्रेसला सांगितले आहे. विदेश दौऱ्यावर जाताना सरदेसाई यांनी दिल्लीत काही वेळ थांबून काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेतली व दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात गिरीश चोडणकर यांनाच तिकीट देण्याची मागणी केल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे.
काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने तेलंगणा, बिहार आदी मोठी राज्ये तिकिटे निश्चित करण्यासाठी चर्चेला घेतल्याने गोव्यातील तिकिटे जाहीर होण्यास थोडासा विलंब झाला. रात्री उशिरापर्यंत किंवा आज, मंगळवारी गोव्याचे उमेदवार जाहीर होतील. - माणिकराव ठाकरे, काँग्रेसचे गोवा प्रभारी