लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को: नववर्षाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी बुधवारी तामिळनाडू येथून गोव्यात फिरण्यासाठी आलेल्या एका पर्यटक जोडप्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. वास्कोतील पेट्रोल पंपावर घडलेल्या अपघातात या जोडप्याच्या दोन वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी अंत झाला. आफीया असे त्या चिमुकलीचे नाव आहे.
गोवा फिरण्यासाठी हे जोडपे काल सकाळी वास्कोत आले होते. त्यांनी वास्कोतूनच 'रेंट अ बाईक' घेऊन पुढील प्रवासाला जात असताना त्या दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी ते जोडपे एका पेट्रोल पंपवर थांबले. त्यावेळी पत्नी आपल्या दोन वर्षांच्या आफीयाला घेऊन दुचाकीवरून उतरून बाजूला उभी राहिली. यावेळी दुचाकीवर पुढच्या बाजूस सहा वर्षांची मुलगी होती. पेट्रोल भरण्यासाठी दुचाकीवरून उतरत असताना अचानक आफीयाच्या वडिलांचा तोल गेला व त्याचा धक्का पत्नीला बसला. यात पत्नीच्या कडेवर असणारी आफीया खाली पडली. त्याचवेळी तिचे वडील दुचाकीसह तिच्या अंगावर पडल्याने ती गंभीर जखमी झाली.
घटनेनंतर आफीयाला तातडीने चिखली येथील उपजिल्हा इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीनंतर तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. वास्को पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. शवचिकित्सेनंतर मृतदेह कुटुंबाच्या स्वाधीन केला. बुधवारी संध्याकाळी आफीयाचा मृतदेह मडगावमधील कब्रस्तानात दफन केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.