लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : राज्यभरातील शाळांमध्ये २९ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. यात खासदार, आमदार, पंचायत सदस्य आदी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि इतरांना आमंत्रित करून निवृत्त अधिकाऱ्यांसारख्या प्रतिष्ठित व्यक्तिनाही या विद्यार्थ्यांसोबत सहभागी करून घेतले जाणार आहे.
या कार्यक्रमाची जास्तीत जास्त प्रसिद्धी करण्यासाठी विद्यार्थ्यांप्रमाणे पालकांनीही सहभाग घ्यावा, असे निर्देश देत स्टेट कौन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगने (एससीईआरटी) थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी पालकांनाही शाळांमध्ये आमंत्रित केले आहे.
राज्यभरातील जास्तीत जास्त विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना पंतप्रधानांच्या उत्साहवर्धक मार्गदर्शनाचा फायदा होईल, याची खात्री करण्यासाठी, सर्व शाळांना आवश्यक व्यवस्था करण्याची सूचना देण्यात आली आहे. जेणेकरून सर्व इयत्ता नववी आणि त्यावरील विद्यार्थी प्रोजेक्शन स्क्रीन किंवा रेडिओद्वारे टेलिकास्ट पाहू तसेच ऐकू शकतात.
ही माहिती सर्व शाळांच्या वेबसाइट आणि सोशल मीडिया ग्रुपद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रसारित केली जाऊ शकते. सर्व शाळांना कार्यक्रमाची प्रसिद्धी करण्यासाठी शाळेच्या आवारात कार्यक्रमाचे पोस्टर आणि बॅनर लावण्यासही त्यांना सांगण्यात आले आहे.