पणजी : राज्य सरकारने सुधारित मुख्यमंत्री रोजगार योजना अधसूचित केली आहे. या अंतर्गत स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यास इच्छुकाला केवळ २ टक्के व्याजदराने २५ लाखांपर्यंतचे कर्ज मिळेल.
सुधारित मुख्यमंत्री रोजगार योजना १ एप्रिल पासून अंमलात येईल. व्यवसाय सुरु करताना युवकांसमोर आर्थिक अडचण येऊ नये यासाठी सरकारने मुख्यमंत्री रोजगार योजनेत महत्वाचे बदल केले आहेत. यात कर्जाच्या रक्कमेवर कमी व्याजदर लागू करणे, उत्पन्न मर्यादा ही अट काढून टाकणे आदी महत्वाच्या बदलांचा त्यात समावेश आहे.
सुधारित मुख्यमंत्री रोजगार योजने अंतर्गत अर्ज करणाऱ्यांना २५ लाखांपर्यंतचे कर्ज २ टक्के व्याज दरांनी उद्योजकांना मिळेल. यापूर्वी या योजनेचा लाभ घेणाऱ्याना उत्पन्न मर्यादा होती. मात्र उत्पन्न मर्यादेची ही अट हटवली असून वयोमर्यादा सुद्धा ५० वर्ष इतकी केली आहे.
मद्य तसेच तंबाखू व्यवसाय सोडला तर अन्य आर्थिकदृष्टया सक्षम व कायदेशीर व्यवसायांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. सामान्य सेवा केंद्रे, ग्रामस्तरीय उपक्रम, स्टार्टअप्स, होमस्टे, बेड, ब्रेकफास्ट आणि सिव्हिल/इलेक्ट्रिकल कंत्राटदार या योजनेअंतर्गत समाविष्ट आहेत.