म्हापसा : मासळीतील घातक फॉर्मेलिन रसायन प्रश्नावरून गोवा सरकारने शेजारील राज्यातून मासळीच्या आयातीवर बंदी लागू केली आहे. उत्तर गोव्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या म्हापशातील मासळी बाजारात राज्याबाहेरील मासळी आणून विक्री करण्याचा प्रयत्न स्थानिक विक्रेत्यांनी हाणून पाडला. हे प्रकरण हमरीतुमरीवर येण्यापूर्वीच विक्रेत्यांनी घटनास्थळावरून पऴ काढला.
शुक्रवारी (20 जुलै) आठवडी बाजाराच्या दिवशी सकाळी ९ वाजता मासळी मार्केटमध्ये विक्रीसाठी मासळी आणण्यात आली होती. सदर मासळी शेजारील राज्यातून आल्याची माहिती मिळताच स्थानिक विक्रेत्यांनी मासे घेऊन आलेल्या विक्रेत्यांना गराडा घातला व त्यांना मासळी विकण्यापासून प्रवृत्त केले. मासळी विक्रीसाठी उपलब्ध नसल्याने आक्रमक झाले आहेत. त्यात बाहेरील मासळी विक्रीसाठी आल्याने स्थानिक विक्रेत्यांच्या आक्रमक भूमिकेत आणखीन भर पडली व सर्व जण त्यांच्यावर तुटून पडले. या गडबडीत आलेले विक्रेते घटनास्थळावरून काढता पाय घेत पळून गेले.
म्हापशातील मासळी विक्रेत्या संघटनेच्या अध्यक्षा शशिकला गोवेकर यांनी विक्रीसाठी आणलेली मासळी कुजलेली असल्याचा दावा केला आहे. या मासळीपेक्षा मडगाववरून गोव्यात येणारी मासळी किती तरी पटीने दर्जेदार असून मासळीच्या प्रश्नावरून राजकारण केले जात असल्याचा आरोप केला. १ ऑगस्ट पासून राज्यातील मासेमारी सुरू होणार आहे. मासेमारी सुरू झाली तरी ती राज्यासाठी पूरक ठरणार याबद्दल गोवेकर यांनी साशंकता व्यक्त केली. मडगाववरून मासळी पुरविली जात असल्याने गोवेकरांच्या गरजा भागवल्या जात असल्याचा दावा त्यांनी केला.
प्रवीण शेट्ये या विक्रेत्याने विक्रीसाठी आणण्यात आलेल्या मासळीची अन्न व औषध प्रशासनाने तपासणी करावी अशी मागणी केली. मासळी आयात करण्यासाठी राज्यात बंदी असून सुद्धा मासळी आलीच कशी असा प्रश्नही त्यांनी केला. सध्या बाजारात मासळीचा मोठा दुष्काळ पडल्याने नदीतील गावठी मासळीला मोठी मागणी आली असून विक्रीसाठी आणली जाणारी नदीतील मासळी अवघ्या मिनीटात संपून जाते. समुद्रातील मासळी विक्रीसाठी येणे बंद झाल्याने मार्केटात शुकशुकाट पडलेला आहे. दरम्यान म्हापशातील मार्केटात विक्रीसाठी आलेल्या मासळीची तपासणी अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने केली जाणार आहे.