पणजी : गोव्यात सरकारने जनता कर्फ्यू आणखी तीन दिवसांनी वाढवला आहे. त्यामुळे आता २५ रोजी गुढी पाडव्यानंतरच सरकारचे पुढील पाऊल स्पष्ट होईल. गरज पडल्यास लॉकडाउनची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढविली जाईल, असे सांगण्यात आले. शेजारी महाराष्ट्र तसेच अन्य राज्यांनी ३१ पर्यंत लॉकडाऊन जाहीर केले. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यातील आढावा घेऊन जनता कर्फ्यू आणखी तीन दिवसांनी वाढविण्याचा निर्णय घेतला. त्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा, शेजारी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुराप्पा व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी या विषयावर सावंत यांनी चर्चा केली. ‘कोरोना व्हायरस’च्या संसर्गाचा एकजुटीने व एकदिलाने सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार जनता कर्फ्यूला रविवारी सकाळी सुरुवात झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील स्थितीचा आढावा घेतला. कोरोना विषाणूचा संसर्ग एकमेकांच्या जवळ जाण्याने होत असल्यामुळेच लोकांनी गर्दी करू नये, एकमेकांच्या जवळ जाऊ नये आणि घरीच थांबावे, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी जनता कर्फ्यू तीन दिवसांनी वाढवला असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. आरोग्य विषयक व आणीबाणीच्या सेवा वगळता सर्व बंद राहणार आहे. सरकारी कार्यालये, खाजगी कार्यालयेही बंद राहतील, असे त्यांनी एका प्रश्नावर सांगितले. तीन दिवसांनंतर पुन: स्थितीचा आढावा घेऊन गरज पडल्यास लॉकडाउन येत्या ३१ पर्यंत वाढविला जाईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, अनेक लोकांनी यापूर्वीच अत्यावश्यक वस्तूंची बेगमी केली आहे. त्यामुळे अशा लोकांकडून फारशा प्रतिक्रिया आल्या नाहीत परंतु ज्यांनी बेगमी केलेली नाही त्यांच्यासमोर मात्र प्रश्न उपस्थित झाला.
कर्नाटक, केरळच्या कोंबड्यांवर बंदी ‘कोरोना’बरोबरच बर्ड फ्ल्युचाही धोका असल्याने उत्तर गोवा जिल्हाधिकाºयांनी कर्नाटक व केरळमधून गोव्यात आयात केल्या जाणाºया कोंबड्यांवर बंदी घातली आहे. काल मध्यरात्रीपासून ही बंदी लागू झाली असून या राज्यांमधून थेट अथवा अप्रत्यक्षपणे गोव्यात कोंबड्यांची आयात करता येणार नाही. दक्षिण गोवा जिल्हाधिकाºयांकडूनही अशाच प्रकारचा आदेश् काढला जाणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी दुध, भाजीपाला, मासळीचा तुटवडा निर्माण झालेला आहे.